मताधिक्य द्या; विधानसभा घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:32 AM2019-04-08T00:32:05+5:302019-04-08T00:34:00+5:30
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आमदारकीसाठी इच्छुक असलेल्यांकडून विधानसभा प्रचाराचे घोडे न्हाहून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे़ प्रमुख पक्षांच्या श्रेष्ठींनीही आता अशा इच्छुक उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत आपल्या भागातून प्रतिस्पर्धी उमेदवारावर मताधिक्य घेऊन दाखवा
नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आमदारकीसाठी इच्छुक असलेल्यांकडून विधानसभा प्रचाराचे घोडे न्हाहून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे़ प्रमुख पक्षांच्या श्रेष्ठींनीही आता अशा इच्छुक उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत आपल्या भागातून प्रतिस्पर्धी उमेदवारावर मताधिक्य घेऊन दाखवा, विधानसभेचे तिकीट निश्चित करण्यासाठी याचा तुम्हाला उपयोग होईल, असे स्पष्ट निर्देश देत नेतृत्त्वाची दुसरी फळीही कामाला लावली आहे़
लोकसभा निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीला वेग आला आहे़ काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण रिंगणात उतरले आहेत़ त्यांची लढत महायुतीचे प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित आघाडीचे प्रा़ यशपाल भिंगे यांच्यासोबत होत आहे़ तीनही प्रमुख पक्षांनी आपल्या पद्धतीने प्रचारात जोर लावला आहे़ विविध तालुक्यांतील आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना कामाला लावले आहे़ लोकसभेनंतर अवघ्या काही महिन्यांनी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे़ या अनुषंगाने विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभेत आपल्या अस्तित्वासाठी प्रचारात झोकून दिले आहे़
नांदेड लोकसभा मतदारसंघा- अंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ येतात़ नांदेड उत्तर मतदारसंघ काँग्रेसकडे असून तेथून डी़ पी़ सावंत प्रतिनिधित्व करीत आहेत़ तर दक्षिण मतदारसंघ शिवसेनेकडे आहे़ येथून हेमंत पाटील निवडून आले होते़ मात्र हेमंत पाटील यांना हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेली असल्याने शहरातील दक्षिणचीही ही जागा शिवसेनेसाठी मोकळी झाली आहे़ भोकर विधानसभा मतदारसंघातून अमिता चव्हाण काँग्रेसच्यावतीने प्रतिनिधित्व करतात़ तर नायगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसेच वसंतराव चव्हाण विद्यमान आमदार म्हणून कार्यरत आहेत़ देगलूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असून तेथे सुभाष साबणे तर मुखेड मतदारसंघ भाजपाकडे असून तेथून डॉ़तुषार राठोड २०१४ च्या निवडणुकीत निवडून आलेले आहेत़
या सर्व सहाही विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे़ विद्यमान आमदारांचा आपल्या पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा प्रयत्न असणार आहे़ या अनुषंगानेच या सर्व आमदारांनी आपापल्या मतदारसंघात प्रचाराची राळ उडवून दिली आहे़ मात्र ज्या मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झालेला आहे़ तेथे इच्छुकांची संख्या अधिक आहे़ याच ठिकाणाहून आगामी विधानसभेसाठी तिकीट मिळण्याची शक्यता असल्याने या इच्छुकांनी जनसंपर्क वाढविल्याचे दिसून येते़ लोकसभा निवडणुकीसाठी अवघे दहा दिवस शिल्लक आहेत़ या दहा दिवसांत प्रचारात कोण मेहनत घेतो याची नोंदही ठेवली जात असल्याने इच्छुकांसाठी हे दहा दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत़
- भोकर मतदारसंघात भाजपाकडून डॉ़माधवराव किन्हाळकर, नागनाथराव घिसेवाड यांचा दांडगा जनसंपर्क आहे़ तेथे शिवसेनेकडून सतीश देशमुख यांच्यासह शिवाजीराव पाटील किन्हाळकर यांचीही नावे चर्चेत होती़
- देगलूर-बिलोली मतदारसंघ शिवसेनेच्या सुभाष साबणे यांच्या ताब्यात आहे़ तेथे काँग्रेसकडून रावसाहेब अंतापूरकर यांचे नाव पुढे आहे़ तर भाजपाकडून धोंडिबा कांबळे यांनी फिल्डिंग लावल्याचे समजते़
- किनवट-माहूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आ़ प्रदीप नाईक करतात़ येथे भाजपाकडून अशोक पाटील सूर्यवंशी, शिवसेनेकडून ज्योतीबा खराटे तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रा़ हेमराज उईके प्रचारात आघाडीवर आहेत़
- मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघ डॉ़तुषार राठोड यांच्या रुपाने भाजपाच्या ताब्यात आहे़ येथे काँग्रेसकडून हणमंतराव पाटील बेटमोगरेकर आणि शेषराव चव्हाण यांनी प्रचारात जोर लावला आहे़ बालाजी पाटील कारलेकर यांनीही जनसंपर्क वाढविलेला आहे़
- नायगाव-धर्माबाद-उमरी मतदारसंघही काँग्रेसच्या ताब्यात आहे़ वसंतराव चव्हाण या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करीत आहेत़ या मतदारसंघात भाजपाकडून राजेश पवार आणि डॉ़मीनल खतगावकर यांच्यामध्ये चुरस आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसचे बापूसाहेब गोरठेकर, राजेश कुंटूरकर यांचेही या भागात मोठे प्राबल्य आहे़
- नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून डी़ पी़ सावंत प्रतिनिधित्व करतात़ या मतदारसंघात मिलिंद देशमुख, बंडू पावडे हे भाजपाच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत़
- नांदेड दक्षिण मतदारसंघात भाजपाकडून दिलीप कंदकुर्ते, संतुक हंबर्डे प्रचाराची धुरा सांभाळत आहेत़ तर काँग्रेसकडून नरेंद्र चव्हाण,अब्दुल सत्तार हे प्रचारामध्ये अग्रभागी आहेत़