- सुनील चौरे
हदगाव (नांदेड) : नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील अत्यंत दुर्लक्षित असलेल्या कयादू नदीकाठावरील हस्तरा हे गाव दोन दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. या गावातील शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या विवेक चौधरी यांची वायुसेनेच्या प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही बातमी कळताच हस्तरा येथील ग्रामस्थांची छाती अभिमानाने भरून आली. ( Next Chief of Air Staff : Vivek Chaudhary, Bhumiputra of Nanded, has been appointed as the Chief of Air staff)
विवेक चाैधरी यांची देशाचे वायुदलसेना प्रमुख म्हणून नियुक्ती झाली असून ते १ ऑक्टाेबरपासून सुत्रे स्वीकारणार असल्याचे वृत्त मंगळवारी सर्वत्र पसरले. त्या अनुषंगाने बुधवारी सदर प्रतिनिधीने हस्तरा गावात प्रत्यक्ष भेट दिली असता, गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. हस्तरा गावच्या सुपुत्राने घेतलेल्या या गगनभरारीने सर्वांचाच उर अभिमानाने भरून आला. गावकऱ्यांनी ‘लाेकमत’ला सांगितले की, विवेक चौधरी हे हदगाव तालुक्यातील हस्तरा गावचे मूळ रहिवासी आहेत. त्यांचे वडील रामभाऊ गणपत चौधरी हे व्यवसायाने अभियंता होते. त्यांनी हैदराबाद येथे एक कंपनी सुरू केली होती. तर आई मुख्याध्यापिका होत्या. विवेक यांचे प्राथमिक शिक्षण हैदराबाद येथे झाले. हस्तरा येेथे त्यांची शेती व घर आहे. त्यांच्या शेतामध्ये ३०० वर्षांपूर्वी रेणुकादेवीचे मंदिर बांधलेले आहे. आजही त्यांची शेती अवधूत शिंदे हे वाहत आहेत. २०१३-१४ मध्ये विवेक चौधरी हे शेती विक्री करण्यासाठी गावात आले होते अशी आठवणही शिंदे यांनी सांगितली. विवेक चौधरी यांचे आजोबा हदगाव तालुक्यातील कोळी येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक होते. विवेक चौधरी यांचे काका दिनकर चौधरी हे नांदेड येथे वास्तव्यास आहेत तर रत्नाकर चौधरी हे व्यवसायानिमित्त औरंगाबाद येथे वास्तव्यास आहेत. विवेक चौधरी यांना एक बंधू असून ते कॅनडा येथे स्थायिक आहेत. चौधरी यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे हैद्राबाद येथे झाले तर उर्वरित शिक्षण हे पुणे व दिल्ली या ठिकाणी झाले आहे. ते पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अकादमीचे १९८० च्या दशकातील विद्यार्थी असून ते २९ डिसेंबर १९८२ साली वायूसेनेत रुजू झाले होते. विवेक चौधरी यांना मिग आणि सुखोई ही लढाऊ विमाने उडविण्याचा ३८०० तासांचा अनुभव आहे. वायू दलाचे उपप्रमुख होण्याअगोदर ते वायू दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर इन चीफ होते.
निजामकाळात हस्तरा मोठी बाजारपेठनिजामकाळात हस्तरा हे गाव एक प्रसिद्ध बाजारपेठ होती. उमरखेड, कळमनुरी, बाळापूर येथील व्यवहार हे हस्तरा गावावरच अवलंबून होते. विवेक यांचे काका काशीनाथ हे हार्डवेअरचे मोठे व्यापारी होते.
नवरात्र उत्सवासाठी गावात हजेरी मी विवेक चौधरी यांना लहानपणापासूनच ओळखतो, मात्र ते हैदराबाद येथे राहतात. ते माझे शेजारी असून नवरात्र उत्सवासाठी चौधरी कुटुंबीय गावात आवर्जून उपस्थित राहतात. विवेक चौधरी यांचे लग्न झाल्यानंतर ते रेणुका देवीच्या दर्शनासाठी गावाकडे आले होते, त्यांना देशातील सर्वोच्च पदावर बसविण्यात येणार असल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. - मुकुंदराव जोशी, शेजारी, हस्तरा
गावात सत्काराचे नियोजनविवेक चौधरी यांना मी २०१३-१४ मध्ये पाहिले होते. त्यांच्या शेती खरेदी-विक्रीच्या वेळेस मी साक्षीदार होतो. आम्हा गावकऱ्यांना या निवडीचा खूप आनंद झाला आहे. गावात त्यांच्या सत्काराचे नियोजन केले जात आहे. - संजय चौधरी, चुलत भाऊ, हस्तरा
अभिमानास्पद गगनभरारीनांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील हस्तरा गावचे भुमिपुत्र विवेक चाैधरी यांनी घेतलेली गगनभरारी अभिमानास्पद आहे. देशाच्या वायुसेनादल प्रमुखपदी त्यांची झालेली नियुक्ती ही गाैरवाची बाब आहे. नवे एअरचिफ मार्शल विवेक चाैधरी यांनी नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा राेवला आहे. -अशाेकराव चव्हाण, पालकमंत्री, नांदेड