- विशाल सोनटक्के नांदेड : काठी नं घोंगडं घेऊ द्या की रं, मला बी जत्रंला येऊ द्या की रं़़़ हे लोकगीत महाराष्ट्रात घोंगडीच्या घरोघरी होत असलेल्या वापरामुळेच लोकप्रिय झाले़ मात्र महाराष्ट्राची वेगळी ओळख असलेली हीच पारंपरिक घोंगडी यांत्रिकीकरण आणि इतर कारणांमुळे संकटात असल्याचे दिसते़ माळेगाव यात्रेत हजारो घोंगड्यांची दरवर्षी विक्री होते़ मात्र यंदा पानिपत येथून तुलनेने स्वस्त असलेल्या यंत्रावरील घोंगड्या दाखल झाल्याने या पारंपरिक घोंगडीची वीणच विस्कटली आहे़
लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा जशी अश्व आणि प्राण्यांच्या प्रदर्शनासाठी प्रसिद्ध आहे, तशीच ती ऊबदार कपड्यांसाठीही ओळखली जाते़ या यात्रेत रग, रजईसह घोंगड्यांची दरवर्षी लाखोंची विक्री होते़ महाराष्ट्राबरोबरच देशाच्या कानाकोपऱ्यातून व्यापारी येथे दाखल झालेले असतात़ मात्र त्यातही खास धनगरी बाज असलेली पारंपरिक घोंगड्यांना विशेष मागणी असते़ काहीजण तर केवळ घोंगडी खरेदीसाठीच या यात्रेला येतात़ मात्र यंदा याच घोंगड्यावर विघ्न कोसळल्याचे दिसते़
अवकाळी पावसामुळे शेतशिवारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ याचा परिणाम शेतकऱ्यांची यात्रा अशी ओळख असलेल्या माळेगाववरही झाला असून सर्वच वस्तूंची विक्रीही मंदावली आहे़ दुसरीकडे यंदा माळेगाव यात्रेत पानिपत येथे तयार झालेल्या यंत्रावरील घोंगड्या दाखल झाल्या आहेत़ या घोंगड्या पारंपरिक घोंगड्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत़ दुसरीकडे अनेकजण याच यंत्रावरील घोंगड्यांना पारंपरिक घोंगडी म्हणून खरेदी करीत असल्याने अस्सल घोंगड्यांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातून घोंगडी विक्रीसाठी आलेल्या व्यवसायिकांना नुकसान सोसावे लागत आहे़ खरे तर आरोग्यवर्धक म्हणूनही घोंगडीकडे पाहिले जाते़ लोकरीची उष्णता जास्त असल्याने घोंगडीमुळे मनक्याचा, पाठदुखीचा, वातीचा आजार नाहीसा होतो़ घोंगडी पांघरली की पित्तही कमी होते़ त्यामुळे जुनीजाणती माणसे घोंगडी आवर्जून खरेदी करायचे, असे सांगत नवी पिढी मात्र यंत्रावरील घोंगड्यांना फसत असल्याचे व्यवसायिकांनी सांगितले.
14 प्रकारच्या घोंगड्या मिळतात महाराष्ट्रात राज्यात जावळी, हातमाग, पट्टा, पांढरी, बसकर पट्टी, जेन, लोकरगादी, शाल आदी १४ प्रकारच्या घोंगड्या मिळतात. मेंढीच्या लोकरापासून बनविल्या जाणाऱ्या या घोंगड्या आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने हातमागावर बनविल्या जातात. अनेक कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे पिढ्यानपिढ्या हेच काम आहे. कष्टाचे काम असल्याने दिवसभरात दिवसाला एक घोंगडी तयार होते़ मात्र आता या पारंपरिक खरमरीत घोंगड्याऐवजी मऊ ब्लँकेटस् रग याकडे ग्राहकांचा ओढा वाढल्याने त्याचा फटका घोंगडी व्यवसायाला बसत असल्याचे व्यवसायिकांनी सांगितले.
आठ वर्षांपासून मी या यात्रेत घोंगडी विक्रीसाठी येतो़ मात्र प्रथमच मोठ्या प्रमाणावर माल शिल्लक राहिल़ा. विक्री का मंदावली हे कळत नाही़- दादा महाराज (पंढरपूर)
- यंदा यात्रेच्या चार दिवसांत २० टक्केही घोंगड्यांची विक्री झालेली नाही़ यंत्रावरील घोंगड्यांमुळेच विक्री घटली. - करीअप्पा पुजार (कर्नाटक)
पानिपतच्या घोंगड्या यात्रेत विक्रीला आलेल्या आहेत़ त्या ऊबदार नाहीत़ मात्र चांगल्या दिसतात. त्यांची किमत कमी असल्याने ग्राहक तिकडे वळतात.- बाबू धुळे (डोंगरशेनकी, जि़लातूर)