किनवट (जि. नांदेड) : राजकारणात जात आणि पैसा महत्त्वाचा असतो़ माझ्याकडे हे दोन्ही नाही. राजसाहेब मला माफ करा, अशी चिठ्ठी लिहून मनसेचे किनवट शहर प्रमुख सुनील ईरावार (२७, राग़ोकुंदा) यांनी रविवारी सकाळी राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी ईरावार यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात ‘अखेरचा जय महाराष्ट्र’ असे लिहिले आहे. या चिठ्ठीत ते म्हणतात, ‘आमच्या येथे पैसा आणि जात या दोन गोष्टींवर राजकारण आहे आणि हे दोन्ही माझ्याजवळ नाही.आई, पप्पा, काका, काकू, मोठी वहिनी, छोटी वहिनी, शिवा दादा, शंकर दादा, पप्पू दादा मला माहीत आहे मी माफ करण्याच्या लायकीचा नाही. तरी पण तुम्ही मला माफ कराल अशी अपेक्षा बाळगतो. यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझे जीवनसंपवत आहे़ माझ्यामुळे कोणाला त्रास देऊ नका, आई मला माफकर, जय महाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे, राजसाहेब मला माफ करा.’ईरावार हे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक होते़ पक्षवाढीसाठी त्यांनी मोठा पुढाकार घेतला़ आत्महत्येचे नेमके कारण काय याचा तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
राजकारणात जात, पैसा लागतो, मनसेच्या शहर प्रमुखाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 3:01 AM