कंधारः तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतीची राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवार अर्ज दाखल करताना ग्रामपंचायतीचे बेबाकी प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामुळे एकूण ८५० सदस्यासाठी इच्छुकांना कोणतेही कारण न देता करभरणा करणे भाग आहे. त्यामुळे कोरोना काळातील वसूलीला लागलेला लगाम सैल होणार आहे. कर भरणा होऊन आर्थिक बळ मिळून ग्रामपंचायतीना अच्छे दिन येणार असल्याचे मानले जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे ग्रामपंचायतीना मालमत्ता व पाणी कर वसुलीवर मोठा परिणाम झाला.हाताला कामधंदा नव्हता. रोजीरोटीची समस्या शेतकरी, शेतमजूराना भेडसावत होती. त्यामुळे करभरणा करण्याचा प्रश्न गुंतागुंतीचा झाला होता.ग्रामपंचायतीचे आर्थिक गणित विस्कटले होते. अनेक ग्रामपंचायतीना गावातील साधे काम करणे कठीण झाले होते.
कोरोना रूग्णांची संख्या घटत गेली आणि शासनाने अनेक नियम व अटी शिथिल केल्याने सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परंतु ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडल्या. प्रशासक नियुक्तीमुळे गावपुढाऱ्यांंची घालमेल सुरु झाली. परंतु आरक्षण सोडत झाल्यावर निवडणुका होण्याची आशा बळावली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इच्छुकांच्या आंनदाला उधाण आले.तसेच ग्रामपंचायतीना आर्थिक बळ मिळेल असा विश्वास निर्माण झाला.
गावागावात राजकीय चर्चेने रंगत वाढली. बैठका, राजकीय खलबते होऊ लागली. सक्षम उमेदवाराची शोधाशोध सुरू झाली. अनेकांना गावपुढारी पूर्ण तयारी करा असा संदेश देऊ लागले. निवडणूक लढविण्यासाठी राखीव जागेसाठी जात वैधता करण्याची प्रक्रिया, घोषणापत्र भरण्यासाठी आवश्यक माहिती संकलन, हमीपत्र, शपथपत्र, अपत्याचे शपथपत्र आदीची जुळवाजुळव करण्यात इच्छुक मग्न आहेत.
घोषणापत्र क्रमांक १ मध्ये ग्रामपंचायतीची कोणतीही थकबाकी ठेवली नाही. असे नमूद करायचे आहे. त्यासाठी मालमत्ता व पाणी कर भरणा करून बेबाकी करावी लागणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची करवसूली होण्याची मोठी संधी आली आहे. त्यामुळे थोडासे आर्थिक बळ मिळणार आहे.
ऑनलाईन नामनिर्देशन दि.३० डिसेंबर पर्यंत दाखल करावे लागणार आहे. तसेच ४ प्रकारच्या ऑनलाईन नोटरी करायची आहे. त्यात मालमत्ता, गुन्हे माहिती, जातवैधता प्रमाणपत्र १ वर्षात देतो.व शौचालय असल्याचे स्वघोषणापत्र आदीचा समावेश आहे. ऑनलाईन केलेली प्रिंट काढून मग ते सादर करायचे आहे.
शिवाजी मा.व उच्च मा.विद्यालयात प्रक्रिया होणार
उमेदवारी अर्ज दाखल करणे, छानणी, चिन्ह वाटप, मतमोजणी आदी निवडणुकीची सर्व कामे पानभोसी रोडवर असलेल्या श्री.शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात होणार असल्याचे तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आले.दि.१८ जानेवारी पर्यंत याच ठिकाणी सर्व कामे करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.संस्थेने तशी संमती दिली आहे असे सांगण्यात आले.