शहरातील बाफना ते हिंगोली नाका रस्त्यावर सर्वाधिक खड्डे पडले आहेत. त्याचबरोबर गोवर्धनघाट पुलावरून जाताना वाहन रस्त्यावरून चाललेय, की खड्ड्यांतून, असा प्रश्न वाहनात बसलेल्यांना पडतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. वारंवार मागणी करूनदेखील कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नाहीत. दरम्यान, पावसाळापूर्व डागडुजीच्या नावाखाली शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये कंत्राटदारांच्या घशात ओतण्याचे काम महापालिकेने केले आहे. याकडे पालकमंत्री, आमदार, खासदारांनी लक्ष घालून खड्डेमुक्त रस्त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
नांदेड - पूर्णा रस्ता
शहरातील छत्रपती चाैक येथून पुर्णेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वामनराव पावडे पेट्रोल पंपापासून ते पुढे जयभवानी चाैकापर्यंत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही या रस्त्याचे भाग्य उजळलेले नाही.
बाफना रस्ता खड्डेमय
हिंगोली नाका ते बाफना टी पाॅईंट या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील रेल्वे ब्रीजवर गजाळी वर येऊन अपघात घडत आहेत. परंतु, याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष होत आहे.
शहरातील प्रमुख रस्ते सोडले, तर अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे मणक्यांची झीज होते. पाठदुखीसह इतर आजारांना निमंत्रण मिळते. त्याचबरोबर गाडीच्या देखभाल-दुरुस्तीचाही खर्च वाढतो.
- संतोष पावडे, नागरिक
--
काैठ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच जुना काैठा येथून साई मंदिर कमानीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने अपघात वाढले आहेत.
- प्रा. संदीप काळे, नागरिक
वाढत्या वयाबरोबर हाडे ठिसूळ होतात. यामुळे खड्डे असलेल्या रस्त्याने ये-जा करताना ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. वाहनांची गती कमी ठेवून ये-जा करावी. शक्यतो ऑटोतून प्रवास करणे टाळावे. त्याचबरोबर कुठे लचक बसली, तर वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
- डॉ. सुरेश कदम, हाडांच्या आजाराचे तज्ज्ञ
वार्षिक निधीतून तात्पुरती कामे
जिल्हा नियोजन समिती तसेच महापालिकेच्या स्थायी समितीकडून मिळणाऱ्या निधीतून तात्पुरती डागडुजी करण्यात येते. परंतु, पावसाळ्यात पुन्हा डांबर उखडून खड्डे पडतात. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांचे वर्षातून एक वेळ पूर्णपणे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.