हे सरकार फसवे असून शेतक-यांच्या विरोधातले; अजित पवारांची लोहा येथे जोरदार टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 07:05 PM2018-01-20T19:05:59+5:302018-01-20T19:09:05+5:30
हे सरकार शेतकरी हिताचे नसून फसवे आणि त्यांच्या विरोधातले आहे अशी जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोहा आयोजित हल्लाबोल मेळाव्यात केले.
लोहा (नांदेड ) : शेतीसाठीच्या पाणीपट्टीत वाढ, कर्ज माफिची फसवी घोषणा, शेतपंपाचे विज कनेक्शन तोडणे, शेतीला लागणा-या साधन सामुग्रीच्या किंमतीत वाढ केल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यामुळे हे सरकार शेतकरी हिताचे नसून फसवे आणि त्यांच्या विरोधातले आहे अशी जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे आयोजित हल्लाबोल मेळाव्यात केले.
शहरातील बैल बाजार मैदानात आज राष्ट्रवादी काँंग्रेस पार्टीच्या वतीने हल्लाबोल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आ.शंकरअण्णा धोंडगे, तर व्यासपीठावर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, पक्षप्रवक्ते नवाब मलीक, चित्रा वाघ, संग्राम कोते, आ.सतीश चव्हाण, विक्रम काळे, कमलकिशोर कदम, प्रांजली रावनगावकर, बसवराज पाटील, वसंत सुगावे, हरिहर भोसीकर, सुनील कदम, दिलीप धोंडगे, संजय पाटील क-हाळे, बाबुराव केंद्रे आदींची उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात लोहा-कंधार मतदार संघात धरण, तलाव उभारण्याचे निर्णय कुठलाही भेदभाव न ठेवता घेतले. परंतु आजचे सरकार शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडत आहे. कर्ज माफ करण्याची घोषणा केली तिही फसवी निघाली. बेरोजगारांना नोकरी देतो म्हणाले मात्र गेल्या साडेतीन वर्षात एकालाही नोकरी दिली नाही. यामुळे हे सरकार फसवे असून पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली. यानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, नवाब मलिक, माजी आ. शंकरआण्णा धोंडगे यांनी सुद्धा भाषणातून सरकारवर टीका केली.