अर्धापूर/ पार्डी : शासनाकडून शहर स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी शहरातील रस्ते व परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र मोहीम राबविली आहे. मोहीम केवळ कागदावर राबविण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. अर्धापुरातील बहुतांश कार्यालयाच्या भिंती पिचकाऱ्यांनी रंगल्या आहेत.अधिकाऱ्यांपासून ते सेवक स्वच्छता मोहिमेत सहभागी झाला होता. शहरात जागोजागी कचरा व्यवस्थापन करण्यात आले तसेच खुले शौचालय बांधण्यात आले. जागोजागी भिंतीवर सूचनाफलक लावण्यात आले. प्रत्येक कार्यालयात सूचनाफलक लावण्यात आले. धूम्रपान, तंबाखू, पान खाऊन थुंकल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११६, ११७ प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आदेशाचे फलक लावण्यात आले, परंतु ज्या ठिकाणी फलक लावण्यात आले त्याचठिकाणी धूम्रपान करण्यात आले आहे.स्वच्छतेवर भर देण्यासाठी अधिकारी स्वच्छता मोहिमेत सहभागी होते. मात्र शासकीय कार्यालयात तंबाखू, गुटखा खाऊन मारलेल्या पिचकाºयांनी रंगलेल्या भिंती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. धूम्रपान निषेधाचे तहसील कार्यालय, नगर परिषद कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे समोरच धूम्रपान करून भिंती रंगविल्या आहेत. धूम्रपान फलकाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी सामान्य नागरिकांचा वावर असतो. जसे- तहसील कार्यालय, शासकीय रुग्णालय, नगर परिषद, नगरपंचायत, बसस्थानक या ठिकाणी हमखास गुटखा खाऊन कार्यालयाच्या भिंती लाल रंगांनी रंगविल्या आहेत. तसेच कार्यालयात सरास धूम्रपान केले जाते.अर्धापूर तहसील कार्यालयात सार्वजनिक ठिकाणी शासकीय धूम्रपान करणे गुन्हा आहे. तरी तहसील कार्यालयाच्या भिंती पिचका-यांनी रंगल्या आहेत. कार्यालयात किंवा सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाºया कोणत्याही व्यक्तीस दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही, यामुळे येणारे-जाणारे कार्यालयाच्या भिंतीवर गुटख्याची पिचकारी मारीत आहेत.
अर्धापूर येथील शासकीय कार्यालये पिचकाऱ्यांनी रंगली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:44 AM