- गोविंद टेकाळे अर्धापूर ( नांदेड ): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात भारत संकल्प रथयात्रेला प्रारंभ झाला आहे. या यात्रेदरम्यान पिंपळगाव महादेव येथील मराठा समाज आणि इतर ग्रामस्थांनी "भारत सरकारचा कार्यक्रम की मोदी सरकारचा कार्यक्रम" असा जाब अधिकाऱ्यांना विचारला. तसेच जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावात कोणताही कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा दिल्याने अधिकाऱ्यांनी संकल्प यात्रा लागलीच गुंडाळली.
शासकीय योजनांची माहिती संवादासाठी महाराष्ट्रात गुरुवार दि.१६ पासून सुरू झालेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ च्या राज्यस्तरीय मोहिमेचा प्रारंभ राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. सदर यात्रा देशातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यातील गावोगावी राबविण्यात येत आहे. तर नांदेड जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून ही यात्रा सुरू करण्यात आली.
अर्धापूर तालुक्यात दि.२३ नोव्हेंबर रोजी आज पहिल्याच दिवशी विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ पिंपळगाव महादेव येथे आला. मात्र, येथील ग्रामस्थ व मराठा समाज बांधवांनी हा कार्यक्रम घेण्यात येऊ नये असा पवित्रा घेतला होता. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणताही कार्यक्रम नको, आमच्या जखमेवर मीठ न टाकता, आम्हाला प्रशासनाने सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले.
पोलिसांचा ताफा दाखल, प्रशासनाने कार्यक्रम गुंडाळलाराशन कार्ड, घरकुल, मनेरगा अंतर्गत विहीर, शेततळे आदी योजना अर्धापूर तहसील व पंचायत समितीने प्रभावी पणे राबवत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. नुसती कार्यक्रमातून चमकोगीरी नको असा पवित्रा येथील ग्रामस्थांनी घेतला. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक मस्के यांच्या पोलीस पथकाने कडक बंदोबस्त दिल्याने सदर कार्यक्रम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. पण या कार्यक्रमास गावातील एकही नागरीक उपस्थित राहीला नसल्याने प्रशासनाने काढता पाय घेत सदर कार्यक्रम गुंडाळला.
अनेक दिवसांपासून पिंपळगाव म. सक्रिय...मराठा समाजाच्या मागणीसाठी अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील ग्रामस्थांनी साखळी उपोषण, आमरण उपोषण, सामुहिक मुंडण, असंख्य महिला पुरुष मराठा समाज बांधवांचा सामुहिक जेलभरो आदी लक्षवेधी आंदोलने करत राज्य सरकारचे लक्ष वेधले होते.