बिलोली : तालुक्यातील ११ रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया पार पडली. ११ पैकी ५ घाटांचीच बोली लागली़ तर उर्वरित ६ घाट घेण्यास कंत्राटदार अनुत्सूक दिसले. ५ घाटांच्या लिलावात प्रशासनाला ५ कोटी ३१ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला. विशेष म्हणजे, मागील वर्षापेक्षा यावर्षीची रक्कम अधिक आहे.रेतीघाटांची प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने पार पाडली. मात्र, बोळेगाव, कोळगाव वाळू घाटांतून अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.आता ५ रेतीघाटांचे लिलाव झाले असले तरी उर्वरित ६ रेतीघाटांचे लिलाव जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत त्या घाटांवरुन रेतीची तस्करी होणार नाही, याचीही दक्षता महसुल विभागाला घेणे आवश्यक झाले आहे. तालुक्यात मागील काही दिवसांपासून रेतीचे दर गगनाला भिडले आहेत. याचा फटका घर बांधकामालाही बसला आहे. ३ जानेवारी २०१८ च्या महसूल व वन विभाग शासन निर्णयानुसार सन २०१८-१९ साठी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतच्या कालावधीसाठी बिलोली तालुक्यातील ११ रेतीघाटांचे लिलाव ई-निविदा आॅनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. त्यात ११ पैकी ५ रेतीघाटांचा लिलाव झाला, तर उर्वरीत ६ रेतीघाटांकडे कंत्राटदारांनी पाठ फिरवली. मागील काही वर्षांपासून बिलोली तालुक्यातील बोळेगाव, गंजगाव, माचनूर, सगरोळी, कोळगाव तसेच इतर ठिकाणीही रेतीघाटांवरुन लिलावापेक्षा अधिक ब्रास रेतीचे उत्खनन तसेच अवैधरित्या रेतीची तस्करी होत आहे़ यावर आळा बसावा यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीने अनेक वाहनांवर कार्यवाही करण्यात येते. मात्र, अवैधरित्या रेतीतस्करीचा प्रकार अद्यापही तालुक्यात सुरु आहे. त्यातच ११ पैकी ५ रेतीघाटांचे लिलाव झाले आहे. यामुळे रेतीचे दर कमी होतील, अशी आस असली तरी उर्वरित ६ रेतीघाटांवरुन रेतीची अवैध तस्करी होणार, अशी स्थिती दिसून येत आहे.लिलावातील मिळालेला महसूलजिल्ह्यातील दुसऱ्या लिलाव फेरीत बिलोली तालुक्यातील ११ पैकी ५ रेतीघाटांचा लिलाव पूर्ण झाला. ज्यामध्ये माचनूर वाळूघाटास सर्वाधिक १ कोटी ७३ लाख २७ हजार बोली प्राप्त झाली. त्यापाठोपाठ सगरोळी येथील वाळूघाटास १ कोटी ५४ लाख ९९ हजार, गंजगाव क्र.२ घाटास १ कोटी ४४ लाख ५ हजार, बोळेगाव वाळूघाटाला १ कोटी ३१ लाख ९० हजार तर कार्ला बु.वाळूघाटाला ५७ लाख ४ हजार रुपयांची बोली लागली. या फेरीतील बोली प्रक्रियेतून बिलोली तालूक्यातून ५ कोटी ३१ लाख ६५ हजार रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे.मांजरा नदीपात्रातील लाल वाळूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या वाळूला बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. महाराष्ट्रासह नजीकच्या तेलंगणा-आंध्र-कर्नाटकमध्ये मांजरा नदीतील वाळूघाटांवर रेती वाहतूक केली जाते. कर्नाटक प्रदेशात बोळेगाव व सगरोळी रेतीघाटांतील रेतीला विशेष महत्त्व जाते.
रेतीघाट लिलावात प्रशासनाला रग्गड कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:14 AM
तालुक्यातील ११ रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया पार पडली. ११ पैकी ५ घाटांचीच बोली लागली़ तर उर्वरित ६ घाट घेण्यास कंत्राटदार अनुत्सूक दिसले.
ठळक मुद्देबिलोली तालुक्यातील वाळूघाटांचा लिलाव ११ पैकी ५ घाटांचा झाला लिलाव६ घाटांकडे कंत्राटदारांची पाठ