नांदेड : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या प्रक्रियेत उमेदवारी अर्ज दाखल करणे, प्रचार, उमेदवारी परत घेणे यासह सभा, निवडणूक प्रशिक्षण आदींना गर्दी झाल्याचे दिसून आले; परंतु यातील अनेकांनी कोरोनाच्या नियमांना फाटा दिला होता. ना कर्मचारी ना उमेदवार यापैकी कुणाचीही कोरोना तपासणी करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कोणतेही कार्यक्रम घेण्यासाठी अगोदर कोरोना तपासणी करणे गरजेचे आहे; परंतु ग्रामपंचायत निवडणूक मात्र त्यासाठी अपवाद ठरली. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसांपासूनच कोरोनाच्या सर्व नियमांना तिलांजली देण्यात आली. बहुतांश ठिकाणी उमेदवार किंवा कार्यकर्ते यापैकी कुणीही मास्क घालून नव्हते. सामाजिक अंतराचेही तीनतेरा वाजविण्यात आले होते. उमेदवारी मागे घेतानाही तोच अनुभव आला. तर दुसरीकडे प्रशासनाने कर्मचाऱ्यांसाठी ठेवलेल्या प्रशिक्षणातही तोच प्रकार दिसून आला. या ठिकाणी कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली नव्हती.