उमरी (नांदेड) : सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक , राज्यस्तरीय आदर्श शिक्षक , निवृत्त प्राचार्य ग.पि. मनूरकर यांचे मंगळवारी ( दि. २७ ) सकाळी निधन झाले.
गोदाकाठी वसलेल्या मनूर या गावाचे मनूरकर हे मुळचे रहिवासी होते. केवळ ग.पी. मनुरकर यांच्या नावामुळे या गावाची संबंध महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे उत्तम उदाहरण म्हणजे मनूरकर गुरुजी. दहा वर्षे शिक्षक व २४ वर्षे मुख्याध्यापक अशी त्यांची उमरीतील शैक्षणिक क्षेत्रातील कारकीर्द राहिली. राज्य शासनातर्फे त्यांचा आदर्श शिक्षक म्हणूनही गौरव झाला. उमरी परिसरात शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्राला त्यांनी समृद्ध केले.
कथा , कादंबरी , कविता व वैचारिक लेख या प्रकारात त्यांनी विपुल लेखन केले असून त्यांची पंधरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शहरात राहूनही गुरुजींची नाळ मनूर या गावाशी भक्कमपणे जोडलेली होती. ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. असा मानस गुरुजींचा होता . म्हणून गावातील माणसं डोक्याने, विचाराने सुधारली पाहिजेत या हेतूने त्यांनी गावात आपल्या वडिलांच्या नावाने स्वखर्चातून एक भलं मोठं वाचनालय उभारलं. गावात त्यांनी अनेक संमेलने घेतली. मात्र, आज त्याच गावात गुरुजींच्या निधनाने शोककळा पसरली. शेकडो विद्यार्थी गुरुजींनी घडविले. हीच मुले आज महाराष्ट्रासह परदेशातही मोठ्या पदावर कार्यरत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेली मृत्यूशी झुंज आज संपली. नांदेड येथील गोवर्धन घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी , तीन मुले , एक मुलगी , सूना , जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.