कुंटूर (जि. नांदेड) : ग्रामपंचायत निवडणुकीतील जय पराजयाची धग ग्रामीण भागात अद्यापही कायम आहे. निवडणुकीच्या कारणावरून वाद-विवाद, भांडण तंटे चालूच आहे. अशीच एक घटना कुंटूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मौजे मेळगाव येथे दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी घडली. पोलिसांनी दोन्ही गटांच्या २१ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत.
मेळगावची ग्रामपंचायत निवडणूक गावचे पोलीस पाटील हणमंतराव पाटील आणि विनोद शिंदे यांच्या गटांत झाली. यात पाटील यांच्या गटाचे तीन, तर शिंदे यांच्याही गटाचे तीन उमेदवार निवडून आले. त्यामुळे सरपंचाची निवडणूक नाणेफेकीने झाली. यात पाटील यांच्या गटाचा उमेदार सरपंच म्हणून निवडून आला. दरम्यान, दुसरीकडे विनोद शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सरपंचांची तक्रार केली. विद्यमान सरपंचांनी अतिक्रमण केले असून, त्यांच्या घरी शौचालयही नसल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले.
तक्रारीच्या चौकशीसाठी विस्तार अधिकारी आल्याचे कळताच सरपंचांनी रस्त्यावर आलेल्या पायऱ्या तोडल्या व विस्तार अधिकारी चौकशीला आले असता त्यांना मी अतिक्रमण केले नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तक्रार केल्याचा राग मनात ठेवल्याने दोन्ही गटांत धुसूफूस सुरू झाली आणि २१ एप्रिल रोजी सकाळी लाठ्याकाठ्यांनी दोन्ही गट आपसात भिडले. यात पाटील गटाचे १० आणि शिंदे गटाचे ११ अशा एकूण २१ जणांविरुद्ध कुंटूर पोलिसांत गुन्हे नोंदविण्यात आले.
प्रथम फिर्याद प्रदीप धसाडे यांनी दिली, त्यावरून पोलिसांनी विनोद शिंदे, मोहन शिंदे, दत्ता शिंदे, संतोष शिंदे, आनंदा शिंदे, उद्धव नरवाडे, गणेश शिंदे, शिवाजी नरवाडे व इतर दोन अशा १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला, तर विनोद शिंदे यांच्या तक्रारीनुसार हणुमंत शिंदे, प्रदीप धसाडे, ज्ञानेश्वर शिंदे, दत्ता शिंदे, माधव धसाडे, उद्धव धसाडे, वैजनाथ शिंदे, सुनील धसाडे, संदीप धसाडे, अविनाश शिंदे, आदी ११ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. तपास सहायक पोलीस निरीक्षक करीमखा पठाण करीत आहेत.