- अविनाश चमकुरे
नांदेड : दहावीच्या उंबरठ्यावर असताना वडिलांचे छत्र हरवलेल्या कृष्णाला कायम पाठबळ देण्याचे काम पंच्याऐंशी ओलांडलेल्या आजोबांनी केले. घरात सधनता असूनही शिक्षणाला महत्त्व देणाऱ्या या कुटुंबाचा उद्धारक व्हायचंय, कृष्णा तुला लाल दिव्याच्या गाडीत पाहायचंय, अशी इच्छा बाळगणाऱ्या व्यंकटरावांचा शब्द खरा ठरवत कृष्णाने यूपीएससीचा गोवर्धन लीलया पेलला आहे. एवढेच नव्हे तर हे यश मिळवताना दहावीपासून तेवत ठेवलेला गुणवत्तेचा आलेख यूपीएससीतही राखत कृष्णा पाटील याने देशपातळीवर १९७ वा क्रमांक पटकावला असून, त्यामुळे मराठवाड्याच्या नावलौकिकात भर पडली आहे.
पेशाने शिक्षक असलेले व्यंकटराव पाटील यांचे मूळ गाव उदगीर तालुक्यातील कोदळी असून, त्यांना दोन मुले होती. दोघांनाही त्यांनी उच्च शिक्षित केले. सोबतच चांगले संस्कार रुजवत सामाजिक जीवनात त्यांना सक्रिय केले. परिणामी त्यांचा मुलगा बब्रूवान पाटील यांनी शिक्षणासोबत समाजकारण करत स्वत:चे वेगळे वलय निर्माण करत उदगीर बाजार समितीच्या संचालकपदी राहून सर्वसामान्यांची सेवा केली. मुलगी कावेरी व मुलगा कृष्णा हे शाळेत शिक्षण घेत होते. सर्व काही सुरळीत सुरू असताना २०१२ साली बब्रूवान पाटील यांचे हृदयविकाराने अकाली निधन झाले. मुलाच्या मृत्यूने संपूर्ण परिवारावर शोककळा पसरली; परंतु खचून न जाता दहाव्या वर्गात शिकणारी कावेरी व नववीत असलेल्या कृष्णाला भक्कम साथ देण्याचे काम आजोबा व्यंकटराव पाटील यांनी केले.
संस्काराची रुजवण झालेला कृष्णा अभ्यासात लहानपणापासून हुशार होता. त्याला योग्य दिशा व पाठबळ देण्यासाठी संपूर्ण परिवाराने प्रयत्न केले. परिणामी कृष्णा १० वी परीक्षेत गुणवत्ता यादीत आला. त्यानंतर अकरावी, बारावी शिक्षणासाठी लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात प्रवेश दिला. यावेळीही त्याने बोर्डाच्या गुणवत्ता यादीतील स्थान कायम ठेवले. त्यानंतर नांदेड येथील श्री गुरु गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक ॲन्ड टेलिकम्युनिकेशन शाखेत त्याने प्रवेश घेतला. अभ्यासात सातत्य ठेवत त्याने अभियांत्रिकीची पदवी गुणवत्ताश्रेणीत प्राप्त केली.
इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला असता उराशी त्याने यूपीएससीचे ध्येय ठेवून त्याने पाचवीपासूनच्या पाठ्यक्रमिक पुस्तकांचा अभ्यास सुरू केला. येथे साथ देण्यासाठी देगलूर येथील धुंडा महाराज महाविद्यालयात कार्यरत असलेले त्याचे काका डॉ. अनिल व्यंकटराव जाधव व शिक्षिका असलेल्या काकू अरुणा जाधव हे खंबीरपणे उभे राहिले. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर २०१८ च्या शेवटी कृष्णाने ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करत दिल्ली गाठली; परंतु कोरोना आल्याने तो परत नांदेडला काकाकडे वास्तव्यास आला. यावेळीही त्याने ऑनलाइन क्लासच्या माध्यमातून अभ्यासातील सातत्य कायम ठेवले. पहिल्या प्रयत्नात आलेल्या अपयशाने खचून न जाता पुन्हा जोमाने तयारी केली. दुसऱ्यांदा परीक्षा देत पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मौखिक चाचणीपर्यंत त्याने मजल मारली. यावेळीही काठावर यशाने हुलकावणी दिली; परंतु पुन्हा नव्या जोमाने तयारी करत २०२४ मध्ये त्याने पॉलिटिकल सायन्सअंतर्गत फॉरेजीन पॉलिसी हा विषय निवडून देशपातळीवर पहिल्या दोनशे जणांमध्ये स्थान मिळविले.
आयुष्याचे सोने झालेमुलाच्या अकाली निधनाने खचून गेलो हाेतो. मात्र, कुटुंबप्रमुख म्हणून दु:ख उजागर न होऊ देता मुलगा, सून, नातवंडांसाठी भक्कमपणे उभा राहिलो. घरातील कुणीतरी प्रशासनात असावे, असे कृष्णाच्या वडिलांना कायम वाटत होते. मुलाने पाहिलेले स्वप्न नातवाने पूर्ण केले. आज खऱ्या अर्थाने आयुष्याचे सोने झाले. धाकटा मुलगा अनिल, सून अरुणा, कृष्णाची आई सुवर्णा, बहीण डॉ. कावेरी यांच्यासह आम्ही सर्व आनंदात असल्याची भावना कृष्णाचे आजाेबा व्यंकटराव पाटील यांनी व्यक्त केली.