- प्रकाश गिते (बहादरपुरा,जि. नांदेड)
कल्पक बुद्धीमत्तेचा वापर करून माळाकोळी, ता. लोहा येथील शेतकरी तुकाराम श्रीरंग तिडके यांनी भंगारातील दुचाकीचा वापर करून कल्टिव्हेटर बनवण्यात यश मिळविले आहे.माळाकोळी येथे तुकाराम तिडके यांची दहा एकर शेती आहे. ते पारंपरिक पद्धतीने बैलांच्या साह्याने शेती करीत होते. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस बैलांच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण होत होता. रोजंदारीने बैल आणून शेतीची मशागत करणेही पूर्वीपेक्षा खर्चिक झाले आहे. दिवसाला यासाठी हजार ते बाराशे रुपये खर्च येतो.
यातून सुटका व्हावी याकरिता तुकाराम तिडके यांनी शक्कल लढवली. घरी भंगारात पडलेल्या दुचाकीचे इंजिन, चैन सॉकेट, टायर हँडल याचा उपयोग करीत लोखंडी चॅनलपासून नट-बोल्ट व वेल्डिंगच्या साह्याने फ्रेम तयार केली़ त्याच्यावर इंजिन बसवण्यात आले. चैन सॉकेटच्या साह्याने समोरील बाजूस टायर फिट करून त्याला चैन बसवण्यात आली व मागच्या बाजूला पाळी (वखर) बसवण्यात आला. त्याचे एक्सलेटर हातात दुचाकीप्रमाणे हँडलला फिट केले. सदरील उपकरण बनवण्यास ६ हजार रुपये खर्च आल्याची माहिती तिडके यांनी दिली.
या उपकरणाच्या साहाय्याने शेती कसल्यानंतर तिडके यांना चांगले परिणाम दिसून आले. १.२५ लिटर पेट्रोलमध्ये या उपकरणाने एक एकर जमीनीची वखरणी करता येते. दिवसाला पाच एकर जमीन वखरण्याची क्षमता या उपकरणात असल्याची माहिती तिडके यांनी दिली. उपकरणामुळे वेळ व पैसे दोन्हींचीही बचत होत आहे. वखर व कोळपे म्हणूनही याचा वापर करता येतो. चिखलात दुचाकीचे चाक घसरत असल्याने उपकरणाला आणखी विकसित करण्यासाठी लोखंडी चाक बसवणार असल्याचे असल्याचे तिडके यांनी सांगितले. त्यांच्या उपकरणाची परिसरात चर्चा होत आहे.