- गोविंद शिंदे (बारूळ, जि. नांदेड)
आजच्या विज्ञान व स्पर्धेच्या युगात कोणताही व्यवसाय करताना प्रत्येक जण बुद्धीकौशल्याचा वापर करीत काम सोपे करण्याचा प्रयत्न करीत असतात. समाजात असे काही लोक आहेत, ज्यांनी आपल्या संशोधनात्मक प्रयोगशीलतेतून शेतीची कामे सोपी केली आहेत. असाच एक प्रयोग राहटी येथील सुनील पा़ कौसल्ये यांनी केला असून ठिबकचे पेप्सी पाईप जमा करण्याचे हटके यंत्र त्यांनी बनविले आहे.
कमी पावसामुळे शेतकरी सध्या ठिबकचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. ठिबकला पाणी देण्यासाठी पेप्सी पाईपचा वापर होतो़ अंदाजित हा पाईप ४० ते ५० फुटाचा असतो़ पीक घेताना आपण ठिबक पूर्ण शेतीच्या पिकात सऱ्यावर सोडले जाते व पीक पूर्ण झाल्यानंतर हे पेप्सी पाईप काढले जाते. शेतकऱ्यांना हे पेप्सी पाईप हाताने जमा करून ठेवावे लागते. प्रत्येक शेतातील ४० ते ५० सरीतील पाईप गुंडाळा करण्यासाठी हाताने किमान तीन ते चार मजूर लावून दिवसभर काम होत होते़ तसेच गुंडाळा करताना हाताने या पाईपची मोडतोड होत होती़
राहटी येथील तरूण शेतकरी सुनील पाक़ौसल्ये यांनी पेप्सी पाईप १ मजूर २ तासात ४० ते ५० सरीतील सर्व पाईप सुरक्षित गुंडाळा करण्याचे यंत्र तयार करण्याचा संकल्प केला़ सुनील हे शेतीसोबतच जोडधंदा म्हणून इलेक्ट्रीक मेकॅनिक आहेत़ त्यांनी त्यांच्या दुकानातील भंगारमधील फेकून दिलेले मोटारीची जुन्या दोन बेरींग घेतल्या. गजाळीचे चाराने साईजचे दीड फुटाचे लांबीचे गोल राऊंड तयार केले़ त्यासाठी गजाळी २५ फुट घेवून हे काम केले़ त्यानंतर इलेक्ट्रीक उपकरणाच्या साहित्याने एक्सल रॉड सारखा तयार करून त्याला स्टँड बसविले़ वेल्डींग करून या यंत्राला फिरविण्यासाठी पॅन्डल बसवून हे यंत्र अंदाजित एक हजारच्या आत तयार केले़ या यंत्रामुळे एका ठिकाणी बसूनच एक जण पेप्सी पाईप सुरक्षित जमा करू शकतो़ या यंत्रामुळे प्रभावित होऊन अनेक शेतकरी त्यांच्या शेतावर भेटी देत आहेत. यंत्रामुळे श्रम व वेळ वाचविण्यात त्यांना यश मिळाले आहे.