नांदेड : जगभरात फ्रान्स, इटली, जर्मनी, जपान आणि भारतात ‘गुरुत्वाकर्षण लहरी’ मोजण्यासाठी महाकाय वेधशाळा म्हणजेच लिगो उभारण्यात आल्या आहेत. २०१५ मध्ये या लहरींचा शोध लागला आहे. शोध लागल्यानंतर या लहरींचा फायदा म्हणजे एक बंद पेटीतला खजिना आहे, असे मत जागतिक ख्यातीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात रविवार सायंकाळी ‘गुरुत्वाकर्षणाच्या लहरी’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. नारळीकर बोलत होते. डॉ. नारळीकर म्हणाले, अगदी न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा नियम पहिल्यांदा दाखवून दिला. त्यानंतर अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी गुरुत्वाकर्षणाचे वेगळे रूप मांडले. त्याही पुढे जाऊन आज आपण अगदी अतिसूक्ष्म पद्धतीने या लहरींचा शोध घेत आहोत. लिगो यावेधशाळेमध्ये ४.५ किलोमीटरचा एक बोगदा तयार करण्यात येतो. जो अगदी शांत असतो. ज्यामध्ये लेझर किरणे सोडली जातात त्या किरणांवर अगदी सूक्ष्म लहरी परावर्तीत होतात. याद्वारे अब्जावधी वर्षांपूर्वीच्या दोन ग्रहांमधील टकरींचा शोध घेता येतो.