नांदेड : अनारक्षित तिकिटांसाठी असलेली अंतराची अट हटविण्यात आली असून, आता रेल्वे परिसराच्या ५ मीटर पलीकडील कोणत्याही ठिकाणाहून युटीएस ॲपच्या साह्याने अनारक्षित तिकीट काढता येणार आहे. त्यामुळे या तिकिटांसाठी प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची गैरसोय दूर झाली आहे.
अनारक्षित तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना त्रासमुक्त आणि सोयिस्कर तिकीट व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी, रेल्वेने युटीएस हे मोबाइल ॲप्लिकेशन सुरू केले आहे. या ॲपला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पूर्वी या ॲपवरून अनारक्षित तिकीट काढण्यासाठी ठराविक अंतराचे निर्बंध होते. रेल्वे प्रवाशांना हे ॲप वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी भारतीय रेल्वेने आधीचे अंतरावरील निर्बंध शिथिल केले आहेत. पूर्वी युटीएस ॲपवरून केवळ २० ते ५० किलोमीटर अंतरापर्यंतच उपनगरीय स्थानकांचे तिकीट काढता येत होते, तसेच ॲप वापरण्यासाठीची बाह्य अंतराची मर्यादाही कमी करण्यात आली आहे. स्थानकाच्या ५ मीटर पलीकडील कोणत्याही ठिकाणाहून युटीएस ॲपद्वारे कोणत्याही रेल्वेस्थानकाचे अनारक्षित तिकीट काढता येणार आहे.
साधारणपणे, भारतीय रेल्वेमध्ये एक मोठा प्रवासीवर्ग प्रवासासाठी अनारक्षित तिकिटे खरेदी करून प्रवास करणारा आहे. युटीएस ॲपचा मुख्य फायदा म्हणजे प्रवासी बुकिंग काउंटरवर रांगेत उभे न राहता त्यांच्या सोयीनुसार पेपरलेस अनारक्षित प्रवास, प्लॅटफॉर्म आणि सिझन तिकीट प्रवाशाच्या मोबाइलद्वारे खरेदी करता येते. पेपरलेस असल्याने ते पर्यावरणपूरकही आहे. आर-वॉलेट, पारंपरिक वॉलेट किंवा इंटरनेट बँकिंगसारख्या वॉलेटद्वारे पेमेंट केले जाऊ शकते.
यासंदर्भात माहिती देताना ‘दमरे’चे महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन म्हणाले, विशेषत: अनारक्षित डब्यांमधून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांना आता अंतर मर्यादा शिथिल करून युटीएस मोबाइल ॲप वापरण्याचा लाभ मोठ्या प्रमाणावर मिळतो. ते कोणत्याही ठिकाणाहून तिकिटे खरेदी करू शकतात आणि स्थानकांवर तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे न राहता तिकीट खरेदी करू शकतात.