नांदेड : नांदेडमधुन आज सकाळी ग्रीन कॉरिडोरद्वारे मानवी अवयव मुंबई आणि औरंगाबादला पाठण्यात आले. यामुळे तिघांना जीवदान तर दोघांना दृष्टी मिळणे शक्य झाले आहे.
परभणी येथील उज्वला मुंदडा (४९ ) व त्यांचा मुलगा विशाल यांचा दुचाकीवरून जात असताना अपघात झाला. यात उज्वला यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी नांदेड येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांचे ब्रेन डेड झाल्याचे सांगितले. इतर अवयव चांगल्या स्थितीत असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर आज पहाटे मुंबई येथील डॉक्टरांची एक टीम शहरातील एका खाजगी रुग्णालयात पोहोचली. उज्वला यांचे ह्र्दय मुंबई येथे ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून विमानतळावर नेण्यात आले. यावेळी शहर ४ मिनिटांसाठी स्तब्ध झाले होते. यासोबतच त्यांच्या दोन्ही किडन्या औरंगाबाद येथे नेण्यात आल्या. तर त्यांचे डोळे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दान करण्यात आले.