लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवारी परळी तहसिल कार्यालयावर ठोक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे़ त्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी तसेच आंदोलकांच्या सन्मानार्थ नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे़ नांदेडातही आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालय सोडणार नसल्याने त्यांच्या रात्रीच्या जेवनासाठी शहरातील माय-माऊल्यांनी पिठलं-भाकरी करून पाठविली आहे़मराठा आरक्षणासाठी राज्यभरात काढलेल्या मराठा क्रांती मोर्चाने मराठा समाजाच्या पदरी काहीच न पडल्याने सकल मराठा समाजाने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे़ मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, मेगा भरती रद्द करा यासह विविध मागण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने परळी तहसिलवर ठोक मोर्चा काढला होता़ मोर्चानंतर समाजबांधवानी लेखी आश्वासन मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला़ सदर आंदोलकांच्या समर्थनार्थ नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजबांधवांनी स्वयंस्फुर्तपणे ठिय्या आंदोलन सुरू केले़यासंदर्भात सोशल मिडियाच्या माध्यमातून संदेश पाठविण्यात आले़ सकाळी ११ वाजेपासून विविध संघटना, राजकीय पक्ष, नोकरदार यांनी ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदविला़ मराठा आरक्षणाविषयी घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला़ आंदोलनामध्ये शेकडो तरूणांनी सहभाग नोंदविला़ जिल्हाधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले़ मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार मराठा समाजाने केला आहे़----आंदोलनस्थळीच भोजनदरम्यान नांदेड येथील ठिय्या आंदोलनात सहभागी समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आहे़ या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या समाजबांधवांसाठी शहरातील मराठा भगिनींनी पिठलं भाकरी पाठवून आंदोनस्थळीच जेवणाची व्यवस्था करण्यात आली़---सहभागी होण्याचे आवाहननांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असून शुक्रवारी जिल्ह्यातील प्रत्येक घरातील एका समाजबांधवाने सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले़
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल मराठा समाजाचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 1:06 AM