- श्रीनिवास भोसले
नांदेड : पालकमंत्री अशोकराव चव्हाण नांदेड दौऱ्यावर असताना त्यांचा व्हीआयपी ताफा येणार असल्याने शिवाजीनगर येथील कुसुमताई चौकात दोन्ही रस्त्याची वाहतूक थांबविण्यात आली होती. दरम्यान, एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने अचानक चव्हाण यांचाच ताफा थांबवला आणि इतर गाड्या जाण्यास रस्ता मोकळा करून दिला. याने सारेच अवाक झाले होते मात्र या वाहनांच्या गराड्यातून एक रुग्णवाहिका पुढे गेल्याने ताफा थांबवण्याचे कारण स्पष्ट झाले. यामुळे तेथून निघताना पालकमंत्री चव्हाण यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याचे कौतुक करत स्मितहास्य करून दाद दिली.
नांदेड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु बेशिस्त ऑटो चालक आणि वाहनधारकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे वाढती वाहतूक कोंडी सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. दरम्यान या गोष्टीचा फटका नूतन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या व्हीआयपी ताफ्याला बसू नये म्हणून कुसुमताई चौक येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचा ताफा शिवाजीनगर येथील त्यांच्या घरून कलामंदिर कडे निघाला असता कुसुमताई चौकात वाहतूक थांबविण्यात आली होती.
दरम्यान, या वाहनांच्या गर्दीत कलामंदिर कडून वर्कशॉपकडे जाणारी एक रुग्णवाहिका अडकली. ही बाब पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ कर्मचाऱ्यांच्या मदतीने रुग्णवाहिकेला विरुद्ध रस्त्याने अलीभाई टॉवर कडून रस्ता करून दिला. त्यासाठी काही काळ पालकमंत्र्यांचा ताफाही थांबविला. काही सेकंदात रुग्णवाहिका भरधाव वेगाने वर्कशॉपकडे रवाना झाली आणि त्यानंतर ताफा मार्गस्थ झाला, यावेळी उपस्थित पोलिसांनी चव्हाण यांना सॅल्यूटही ठोकला. दरम्यान, पालकमंत्री चव्हाण यांनी हात दाखवत आणि स्मितहास्य देत पोलिसांच्या समयसूचकतेचे एकप्रकारे कौतुकच केले.यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्यासह रवी राठोड, माने, धुमाळे आदींची उपस्थिती होती. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला असून मंत्री चव्हाण आणि पोलीस कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.