नांदेड : चौदाव्या शतकात गुरु रविदासांनी सामाजिक समानता निर्माण करण्यासाठी भक्तीमार्ग आंदोलनाच्या माध्यमातून या देशातील बहुजन समाजाला सत्य, असत्य व विज्ञानवाद सांगितला. जात अथवा वर्णव्यवस्था ही निसर्गनिर्मित नसून, मानवनिर्मित आहे, तिचा नायनाट झाला पाहिजे, यासाठी त्यांनी मानवनिर्मित जातीव्यवस्था व जातीव्यवस्थेला बळ देणाऱ्या मानवा-मानवात उच्च-निचतेचा विचार निर्माण करणाऱ्या धर्मग्रंथांना नाकारून जातीअंताची लढाई लढली. मुळात गुरू रविदासांचा संघर्ष हा विषमतावादी व्यवस्थेविरूद्ध होता, असे मत इंजि. पद्माकर बाबरे यांनी व्यक्त केले.
कांशी-माया प्रबोधन मंच, नांदेडच्यावतीने आयोजित गुरू रविदास यांच्या जयंती कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरपीएफचे अध्यक्ष मनोजकुमार वाघमारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रेम पाटील बोकारे, गजानन पाटनूरकर, संगम वाघमारे टेलर उपस्थित होते.
बाबरे म्हणाले की, आज देशात गुरू रविदासांच्या विचारांची खरी गरज आहे. रविदास कोणत्या जातीत जन्माला आले हे महत्त्वाचे नाही, ते महामानव होते त्यांची जयंती प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांनी साजरी करून एक आदर्श समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गुरू रविदासांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी बहुजन समाजाला एकत्र करून कांशीरामजी जयंतीपासून विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत विविध कार्यक्रम राबविणार असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणातून मनोजकुमार वाघमारे यांनी गुरू रविदासांचे कार्य सविस्तर सांगून त्यांच्या जीवनकार्याचा इतिहास पाच केडर कॅम्प घेऊन राबविणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवराज कांबळे, उमाजीअण्णा रेड्डी यांनी विचार मांडले.
प्रास्ताविक तुकाराम टोम्पे यांनी केले. सूत्रसंचालन शेख जावेद यांनी केले तर शिवाजी सोनटक्के यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी दिगंबर वाघमारे, गंगाधर सर्जे, करण बनसोडे, बालाजी टोम्पे, कृष्णा टोम्पे, चांदोजी हराळे, उत्तम टोम्पे आदींनी परिश्रम घेतले.