शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने १ ते १० मार्च या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये ६ ते १४ वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या मोहिमेसाठी शालेय शिक्षण विभागासोबतच न्याय व विशेष साहाय्य, महिला व बालविकास, एकात्मिक बालविकास योजना, कामगार विभाग, आदिवासी विकास, अल्पसंख्याक विकास आणि सार्वजनिक आरोग्य या विभागातील अधिकाऱ्यांचा सहभाग असणार आहे. त्यासोबतच सरकारी, खाजगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडीसेविका यांची मदत घेतली जाणार आहे.
चौकट- शहरातील मागास वस्त्या, रेल्वेस्थानक परिसर, ग्रामीण भागातील गावाबाहेरील वस्त्या, पालं, वीटभट्ट्या, दगडखाणी, मोठी बांधकामे, स्थलांतरित कुटुंबे, शहरातील झोपडपट्टी, लोककलावंतांची वस्ती, भटक्या जमाती, तेंदूपत्ता वेचणारी, विड्या वळणारी, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या, शेतमळ्यावरील पालकांची बालके, मागास, वंचित गटातील व अल्पसंख्याक गटातील वस्तीतील मुलांचे सर्वेक्षण होणार आहे.
चाैकट- जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी गावस्तरावरील शाळेतील शिक्षकांना परिसरनिहाय कुटुंब वाटून दिले आहेत. शहरातही वार्डनिहाय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळाबाह्य मुलांची तपासणी करणार आहेत. ही मोहीम १० मार्चपर्यंत हाती घेतली आहे. आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी इतर कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाईल.
- प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, जि. प., नांदेड.
चौकट- तीन ते सहा वयोगटातील बालकांना खाजगी बालवाडी, इंग्रजी माध्यमातील ज्युनिअर केजी, सीनिअर केजीमध्ये जात नसलेल्या बालकांचाही शोध घेतला जाणार आहे. तसेच १८ वर्षांपर्यंतच्या दिव्यांग मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
चौकट- अधिकारी अद्याप फिरकलेच नाही
अर्धापूर शहराजवळील भोकर फाटा येथील कला केंद्रावर जवळपास २०० हून अधिक कलावंत वास्तव्य करतात. याठिकाणी असलेल्या मुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी अद्याप कोणताही कर्मचारी पोहोचला नाही. या ठिकाणी असलेल्या कलावंतांची मुले शाळेत जात असली तरी काही स्थलांतरित कलावंतांच्या मुलांचा शोध घेणे आवश्यक आहे.