सिंचन तलावाचे पाणी रबीसाठी सोडा
बामणी फाटा : नांदेड पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या हदगाव, हिमायतनगर तालुक्यांतील सिंचन तलावाचे पाणी रबी पिकांसाठी शेतकऱ्यांना तात्काळ सोडा, अशा सूचना पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता तसेच अभियंता यांना आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिल्या आहेत.
तालुक्यात केदारनाथ, पिंपराळा, रावणगाव, चिकाळा, निमगाव, चाबरा, निमगाव, सायलवाडी, धनकवाडी, खामगाव, लोहा, मांडवा, हिमायतनगर तालुक्यातील पोटा, पावना या सिंचन तलावांत पाण्याचा मुबलक साठा असून या सिंचन तलावांच्या पाण्यावर शेतकऱ्यांची पिके आधारित आहेत. पिकांसाठी आजघडीस शेतकऱ्यांना आपल्या पिकांसाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असून तात्काळ आपल्या माध्यमातून सर्व हदगाव, हिमायतनगर तालुक्यांतील सिंचन तलावांतील पाणी शेतकऱ्यांच्या पिकांसाठी उपलब्ध करावे, असे जवळगावकर यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान सांगितले.