हदगाव: दोन दिवसांपासुन संततधार पावसामुळे तामसा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला. यामुळे हदगाव-भोकर तालुक्यातील वाहतूक दोन दिवसांपासून ठप्प झाली आहे.
हदगाव-तामसा-किनवट या रस्त्याच्या दुपदरी रस्त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी तामसा गावालगत असलेल्या नदीवरील पुलाचे काम सुरू आहे. जुना पुल पाडुन नवीन पुलाचे काम सुरू केले आहे. पर्यायी व्यवस्था म्हणुन याच नदीवर पाईप टाकुन तात्पुरती वाहतूक सुरू करण्यात आली होती. पण दोन दिवसांपासून पावसाने जोर धरल्यामुळे नदीला रविवारी रात्री पुर आला. त्यामध्ये पुलाची एक बाजू पूर्णपणे वाहून गेली आहे.
शेतकरी अडकुन पडलेशहरातल्या पैलतिराकडील संपर्क तुटल्याने शेतमजूर, वाडी, तामसा तांडा व प्राथमिक आरोग्य केंद्र येथिल नागरीकांना शहरात येण्यासाठी पर्यायी व्यवस्था नाही. सोमवारी दि.१७ रोजी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक खोळंबली होती हदगाव भौकर या दोन तालुक्यांना जोडणारा हा पूल आहे दोन दिवसांपासून वाहतूक बंद झाली आहे नदीचे पाणी कमी झाल्याशिवाय येथे पर्यायी व्यवस्था करता येणार नसल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे
ऐन पावसाळ्यात पुलाचे काम या पुलाचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करणे संबंधित गुत्तेदारास बंधनकारक होते. पण ऊन्हाळयात हे काम ढेपाळले व ऐन पावसाळ्यात काम सुरू केल्यामुळे पोळा सणाच्या पूर्वसंध्येला पुल वाहून गेल्याने शेतकरी व व्यापारी यांना मोठी अडचण येत आहेत. वाहन चालकांना पर्याय उपलब्ध नसल्याने वाहतूक खोळंबली आहे. पावसाळ्यात काम सुरू केल्याने पूल वाहून जाणार नाही तर काय होईल असा संताप परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.