हदगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती शिवसेना-भाजपा युतीच्या ताब्यात गेल्याने काँग्रेस पक्षाचा ९ सदस्य असूनही हिरमोड झाला़ दोन्ही पॅनलकडे संचालकाचे संख्याबळ सारखेच असल्यामुळे चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली़ सभापती व उपसभापती ही दोन्ही पदाची माळ नशिबाने शिवसेना-भाजपा युतीच्याच गळ्यात पडली़गुरुवारी सकाळी ११ वाजात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली़ यावेळी उपविभागीय अधिकारी महेश वडदकर, तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुलकर्णी, एआरओ कार्यालयाचे बिल्लोरे यांची उपस्थिती होती़दोन्ही पक्षाची उमेदवारी अर्ज भरून घेण्यात आले़ शिवसेनेकडून श्यामराव नथुराम चव्हाण यांची सभापती पदासाठी व काँग्रेसकडून त्र्यंबक साहेबराव सूर्यवंशी यांनी उमेदवारी अर्ज भरला होता़ परंतु दोन्ही पॅनलचे उमेदवार संख्या सारखीच झाल्याने चिठ्ठीद्वारे निवड घेण्याचे ठरले़ सुरज संजय लकडे या ४ थीच्या विद्यार्थ्याच्या हस्ते ही चिठ्ठी काढण्यात आली़ यात श्यामराव चव्हाण यांची सभापतीसाठी चिठ्ठी निघाल्याने एसडीएमने त्यांना विजयी घोषित केले़ उपसभापतीची चिठ्ठी शिवसेना-भाजपा युतीचे तामसा गणातील विशाल विश्वंभर परभणकर यांची निघाली़सावरगाव गणातून पराभूत झालेले उमेदवार मारोतराव शिंदे यांनी खंडपीठात रिट याचिका दाखल करून विजयी उमेदवार नागोराव नाईक यांना अपात्र ठरविण्याचा प्रयत्न केला़ हा निर्णय त्यांचे बाजूने लागला असता तर सभापती काँग्रेसचा झाला असता, तसा डाव त्यांनी खेळून पाहिला, परंतु त्यांना अपयश आले़संपूर्ण प्रक्रिया पार पडेपर्यंत उपस्थितांना व मिडीयास माहिती देता येणार नाही असा मज्जाव असतानाही माहिती बाहेर पडली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला़यावेळी उपस्थित काँग्रेसचे माजी आ़ माधवराव पाटील जवळगावकर व अन्य कार्यकर्ते यांचे चेहरे हिरमुसले होते़ बाहेर माहिती कशी आली याचा ताणही चेहऱ्यावर दिसत होता़ काँग्रेसचे एकूण ९ संचालक असूनही त्यांना एकही पद मिळाले नाही़ त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला़ व्यापारी गणाचे संचालक देवराव तंत्रे यांनी काँग्रेसकडून आपली दावेदारी केल्याने त्यांच्या नावाची उलटसुलट चर्चा रंगली होती़ हा विजय सत्याचा आहे़ मी फोडाफोडीचा प्रयत्न केला नाही़ जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे, असे आ़नागेश पाटील आष्टीकर यांनी सांगितले.अपक्ष उमेदवाराच्या पदरी निराशाअपक्ष म्हणून निवडून आलेले कल्याण मोळके यांना काँग्रेसने पक्षात घेवून त्यांना उपसभापती पदाचे दावेदार केले होते़ परंतु त्यांचे नशीबही फळफळले नाही़ किंगमेकर म्हणून ते एक महिना चर्चेत राहिले़ परंतु त्यांच्या पदरी निराशाच आली़ चाभरा गणातून ते निवडून आले होते़ माजी उपसभापती दिलीप देबगुंडे यांचा पराभव करून ते चर्चेत आले होते़ याउलट शिवसेना-भाजपा युतीमध्ये भाजपाला शिवसेनेने तीन जागा सोडल्या होत्या़ त्यापैकी एकच संचालक तामसा गणातून विजयी झाला होता़ विशाल परभणकर असे त्यांचे नाव शिवसेनेने त्यांना उपसभापतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता़ त्यांना या चिठ्ठीमध्ये नशिबाने साथ दिली़
हदगाव कृउबा शिवसेनेच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:34 AM