हदगाव : सामाजिक वनीकरणाची बोगस काम करून बिल उचलल्यानंतर चौकशी समितीची दिशाभूल केल्याचा प्रकार सामाजिक वनीकरण परिक्षेत्र हदगाव विभागात उघडकीस आला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमतकरून आधी बोगस काम केले. त्यानंतर ते उघडकीस येऊ नये म्हणून मे महिन्याच्या भर उन्हाळ्यात वृक्षलागवड करत चौकशी समितीची दिशाभूल करण्याऱ्या सहा जणांना सामाजिक वनिकरण विभागाचे वनसंरक्षक अमीतकुमार मीश्रा यांनी निलंबित केले आहे.
सन २०२१-२२ व २०२२-२३ या दोन वर्षांत सामाजिक वनिकरण परिक्षेत्र हदगाव विभागात रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड न करताच बिले उचलल्याची तक्रार आमदार माधवराव पाटील जवलगावकर यांनी करून चौकशीची मागणी केली. दरम्यान, एप्रिलमध्ये केलेल्या तक्रारीची माहिती मिळताच येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मे महिन्याच्या भर उन्हाळ्यात वृक्षारोपण करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यानंतर जून महिन्यात आलेल्या चौकशी समितीस रोपे मृत झाल्याचे सांगितले. मात्र, समितीने सखोल चौकशी केल्यानंतर सत्य बाहेर आले. वृक्षारोपणातील बोगसगिरी समोर येऊ नये म्हणून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले. यामुळे सामाजिक वनिकरण विभागातील वनसंरक्षक अमीतकुमार मीश्रा यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी, दोन वनपाल आणि तीन वनरक्षक अशा तब्बल सहा जणांना निलंबित केले.
यांना केले निलंबित वनपरिक्षेत्र अधिकारी आरती नामदेव पुनसे, अण्णासाहेब देविदास वडजे, गंगाधर पुरभाजी टेकाले ( दोघे वनपाल), मनुका गणेश राठोड, ज्योती ज्ञानोबा कुटे, राजरत्न कोडींबा साबणे तिघेही वनरक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईने वनविभागात खळबळ उडाली आहे.