नांदेड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या परिवारातील सदस्यांचा सत्कार त्यासोबतच चार जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीचे आयोजन मंगळवार २४ ऑगस्ट रोजी केले आहे. या बैठकीला काँग्रेसचे अर्धा डझन मंत्री उपस्थित राहणार आहेत.
येथील कुसुम सभागृहात सकाळी १० वाजता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या प्रारंभाचे औचित्य साधून ‘व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाएँ संविधान’ या अंतर्गत स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या परिवारातील सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता मालेगाव रस्त्यावरील भक्ती लॉन्स येथे नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार आहे. कार्यक्रमासाठी राज्य प्रभारी एच.के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेेटीवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, सहप्रभारी व अ. भा. काँग्रेस कमिटीचे सचिव संपतकुमार, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, बस्वराज पाटील, शिवाजीराव मोघे, समन्वयक विनायक देशमुख, अभय छाजेड यांची उपस्थिती राहणार आहे.
केवळ निमंत्रितांनाच असेल प्रवेश
कार्यक्रमाची काँग्रेस पक्षाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. भक्ती लॉन्स येथील चार जिल्ह्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत ठेवण्यात आलेल्या आढावा बैठकीस केवळ निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.