नांदेड : कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यात आता कुठे बाजारपेठ निर्बंधासह उघडण्यात आली आहे. परंतु अनेकजण गुन्हेगारीकडे वळले आहेत. त्यातही भुरट्या चोरट्यांचा अधिक समावेश आहे. नांदेड शहरात भरत असलेल्या बाजारात हे चोरटे अतिशय सफाईने मोबाईल लंपास करीत आहेत. दररोज साधारणत: दहाहून अधिक तक्रारी मोबाईल चोरीच्या येत आहेत.
परंतु पोलिसांकडून मात्र मोबाईल चोरीच्या प्रकरणात गहाळ झाल्याची नोंद करण्यात येते. त्यामुळे मोबाईल शोधाची जबाबदारी पोलिसांवर येत नाही अन् ठाण्यातील गुन्ह्यांचा आकडाही वाढत नाही. परंतु यामध्ये तक्रारदाराचा मोबाईल मात्र परत मिळत नाही.
मोबाईल फोन हरविला किंवा चोरीला गेल्यानंतर १४४२२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर डायल केल्यानंतर तुमची तक्रार नोंदविण्यात येईल. तसेच तुमच्या फोनचे नेटवर्क बंद होईल. आयएमईआय क्रमांकावरुन ऑपरेटर्स नेटवर्क ब्लॉक करु शकतील. जेणेकरुन त्या मोबाईलचा दुरुपयोग होणार नाही. नांदेडात यापूर्वी आयएमईआय क्रमांक बदलण्याचे मोठे रॅकेट सक्रिय झाले होते. या ठिकाणी हा क्रमांक बदलल्यानंतर चोरीतील सर्व मोबाईल रेल्वेने हैद्राबाद येथे पाठविण्यात येत होते. त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती करुन परत हे मोबाईल विक्रीसाठी बाजारात आणले जातात. अशी मोठी साखळीच मोबाईल चोरट्यांची असल्याचे दिसून येते.
मोबाईल बाजारातून किंवा प्रवासादरम्यान चोरीला गेल्यानंतर नागरिक ठाण्यात तक्रार देण्यासाठी जातात. या ठिकाणी मात्र ठाण्यासमोरील झेरॉक्स सेंटरवरुन एक अर्ज आणण्यास सांगण्यात येतो. या अर्जामध्ये मोबाईल हा अमूक-अमूक ठिकाणी गहाळ झाल्याचा छापी मजकूर असतो. तक्रारकर्त्याने इतर माहिती भरुन हा अर्ज पोलिसांना द्यायचा अन् पोलिसांनी त्यावर शिक्का मारुन एक प्रत तक्रारकर्त्याला द्यायची. एवढेच सोपस्कार मोबाईल चोरी प्रकरणात केले जातात. त्यामुळे एकवेळेस मोबाईल चोरीला गेल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता नसल्यातच जमा आहे. नागरिकांनीही आता तशी अपेक्षा करणे सोडून दिले आहे. त्यामुळे पोलीसही मोबाईल चोरीचे गुन्हे गंभीरपणे घेत नाहीत.
मोबाईल चोरीत अल्पवयीन मुले
शहरात गुंडांच्या काही टोळ्या आहेत. या टोळीकडे अनेक अल्पवयीन मुले आहेत. या मुलांचा वापर ते चोरीसाठी करतात. बाजारात दोघे ते तिघे मिळून एखाद्या नागरिकाला घेरतात. लहान असल्यामुळे त्यांच्यावर सहसा कुणाचा संशय जात नाही. याचा फायदा घेऊन ते गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या खिशातील मोबाईल लंपास करतात अन् काम फत्ते झाल्यावर काही सेकंदात नजरेआड होतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.