नांदेड - शहरातील तेहरा नगर भागातील एका अंध दाम्पत्याच्या सहा वर्षीय आरोही या नावाच्या मुलीचे अपहरण करुन तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी तिच्या काकाला अटक केली आहे. सोमवारी दिव्यांगांनी अटकेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.
यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी कार्यालयाबाहेर येऊन त्यांचे निवेदन घेतले. तेहरानगर भागातील हट्टेकर या अंध दाम्पत्याचा सहा वर्षीय मुलगी आरोही हाच डोळस आधार होती. १६ ऑगस्ट रोजी तिचा काका संतोष हट्टेकर याने तिचे अपहरण केले. त्यानंतर खून करुन प्रेत गोदावरीत टाकले होते. १८ ऑगस्ट रोजी आरोहीचा मृतदेह गोदावरीत आढळून आला.
या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील सहारा लॉज येथून आरोपी संतोष हट्टेकर याला बेड्या ठोकल्या होत्या. सध्या तो तुरुंगात आहे.या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.