नांदेड : राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या लांबणाऱ्या पदोन्नती नेहमीच वादाचा विषय ठरला आहे. वेळेत पदोन्नती व्हावी म्हणून पोलीस अधिकाऱ्यांना कोर्टाची पायरी चढावी लागते. मात्र त्यानंतरही या पदोन्नती गतिमान होऊ शकलेल्या नाहीत. मंगळवारी राज्यातील काही पोलीस निरीक्षकांना सकाळी बढती देऊन पोलीस उपअधीक्षक बनविले गेले. मात्र त्यांची ही बढती औटघटकेची ठरली. सायंकाळी ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.
२४ जानेवारी २०२२ रोजी राज्यातील ४१५ पोलीस निरीक्षकांची ग्रेडेशन लिस्ट जारी करण्यात आली, ते पोलीस उपअधीक्षक पदावरील बढतीसाठी पात्र आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांना या बढतीची प्रतीक्षा आहे. वास्तविक राज्यात पोलीस उपअधीक्षकांच्या १९२ जागा रिक्त आहेत. मात्र त्यानंतरही वेळेत पदोन्नतीचे आदेश काढले जात नसल्याची ओरड आहे. अशातच २७ मे रोजी १८ पोलीस निरीक्षकांची घाईघाईने महसूल विभाग पसंती क्रमाबाबत माहिती मागविण्यात आली होती. अखेर त्या यादीतील निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली. मंगळवारी ३१ मे रोजी या पदोन्नतीचे आदेश जारी करण्यात आले. कारण, याच दिवशी १८ जणांच्या यादीतील बहुतांश निरीक्षक सेवानिवृत्त झाले. सकाळी पदोन्नतीचे आदेश प्राप्त झाले आणि काही तासानंतर ते उपअधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यामध्ये मिलिंद गायकवाड, कृष्णदेव पाटील, बंडू कोंडूभैरी, आनंदा होडगे, अनिल बोरसे, सुरेश सोनावणे, श्रीमंत शिंदे, इंद्रजीत राऊत, संजय साळुंखे यांचा समावेश आहे.
पदोन्नतीच्या प्रतीक्षेत अनेक सेवानिवृत्तअखेरच्या दिवशी पदोन्नती दिल्याने या अवघ्या काही तासांसाठी पोलीस उपअधीक्षक बनलेल्या अधिकाऱ्यांचा हा आनंद औटघटकेचा ठरला. विशेष असे, या पदोन्नतीच्या प्रतीक्षेत सर्जेराव पाटील, सुधीर खैरनार, रामेश्वर रोडगे, भाऊसाहेब अहेर, मुल्ला अजीमोद्दीन, मुकुंद देशमुख हे काही पोलीस निरीक्षक आधीच सेवानिवृत्त झाले. पुढील महिन्यात सुद्धा आणखी काही निरीक्षक सेवानिवृत्त होणार आहेत.