नांदेड: हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून माहेरी आलेल्या एका ३१ वर्षीय विवाहितेने घरातील पंख्याला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी नांदेड तालुक्यातील तिरूपती नगर, धनेगाव येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात विवाहितेच्या पतीसह चार आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नांदेड तालुक्यातील भायेगाव येथील रूक्मिनबाई गंगाधर मेकाले या विवाहितेला पती गंगाधर काळबा मेकाले, सासरा काळबा मेकाले, ननंद संगिता आंबेगावकर व दिर संतोष काळबा मेकाले यांनी लग्नाचेवेळी बोललेले हुंडयाचे ९० हजार रूपये घेवून ये, म्हणून शारीरिक-मानसिक छळ केला. विवाहितेकडून आपली मागणी पूर्ण होत नसल्याचे लक्षात येताच उपरोल्लेखित आरोपींनी आपल्या बहिणीस मारहाण करून उपाशीपोटी ठेवून छळ करीत होते, असा आरोप मयत रूक्मिणबाई मेकाले यांचा भाऊ राजू बंडेवार (रा. तिरूपती नगर, धनेगाव ता. जि. नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीमध्येच नमूद असल्याची माहिती पोलीस ठाणे अंमलदार प्रविण केंद्रे व मदतनीस अंमलदार जुबेर चाऊस यांनी दिली आहे.
मयत रूक्मिणबाई यांना त्यांच्या सासरच्या मंडळींकडून होणारा त्रास सहन होत नव्हता, त्यामुळे त्या गत तीन महिन्यांपूर्वी माहेरी तिरूपती नगर, धनेगाव येथे रहायला आल्या होत्या. दरम्यान, बहीण रूक्मिणबाई व तिचा पती गंगाधर मेकाले यांचा फोनवरून बोलताना वाद झाला. पती आणि सासरच्या लोकांकडून वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून रूक्मिणबाई यांनी अखेर १६ नोव्हेंबर रोजी साडेचार वाजेदरम्यान माहेरी घरातील पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, अशी तक्रार राजू दिगांबर बंडेवार यांनी दिली आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री भायेगाव येथील चार आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. बालाजी नरवटे हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.