लोकसभेत आमदारांची सत्वपरीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:38 AM2019-04-02T00:38:34+5:302019-04-02T00:40:58+5:30
नांदेड लोकसभेच्या रणधुमाळीला वेग आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे अशोकराव चव्हाण, भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांच्यासह १४ उमेदवार रिंगणात असून, वर्चस्वाच्या लढाईला सुरुवात झाली आहे.
विशाल सोनटक्के।
नांदेड : नांदेड लोकसभेच्या रणधुमाळीला वेग आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे अशोकराव चव्हाण, भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांच्यासह १४ उमेदवार रिंगणात असून, वर्चस्वाच्या लढाईला सुरुवात झाली आहे. मात्र लोकसभेचे हे मैदान मतदारसंघातील सहाही आमदारांची सत्व परीक्षा पाहणारे ठरणार आहे. सर्वाधिक तीन विधानसभा ताब्यात असल्याने लोकसभा मतदारसंघातही काँग्रेसचे वर्चस्व दिसते.
मागील लोकसभा निवडणुकीकडेही राज्याचे लक्ष लागले होते. मात्र काँग्रेसच्या अशोकराव चव्हाण यांनी मोदी लाटेतही काँग्रेसचा हा बालेकिल्ला तब्बल ८१ हजारांहून अधिक मताधिक्याने कायम ठेवला होता. लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे काँग्रेसच्या नांदेडमधील वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र त्याचवेळी केंद्रात सत्ता परिवर्तन करण्यात भाजपा यशस्वी ठरली. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीवेळी महाराष्टÑात युतीच्या आकांक्षा वाढल्या होत्या. मात्र त्यानंतरही काँग्रेसने लोकसभा मतदारसंघातील ६ पैकी भोकर, नायगाव आणि नांदेड उत्तर मतदारसंघात विजय मिळवून आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले होते. मुखेड या एकमेव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे कमळ फुलले तर लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून आ. प्रताप पाटील चिखलीकर तर देगलूर मतदारसंघातून सुभाष साबणे यांनी शिवसेनेचा भगवा फडकाविला. या सर्व सहाही आमदारांची आता लोकसभा निवडणुकीत कसोटी लागणार आहे.
लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुकींना सामोरे जावे लागणार आहे. या अनुषंगाने विधानसभेच्या सर्वच इच्छुक उमेदवारांचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातच विधानसभेचेही घोडे न्हाहून घेण्याचा प्रयत्न असणार आहे. आपल्या पक्षाला आपल्या मतदारसंघातून आपण किती मताधिक्य देतो ? यावर या इच्छुकांना विधानसभेची उमेदवारी मिळणार आहे. या बरोबरच अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने पक्षाचा जोर लोकसभा निवडणुकीपासून विधानसभेपर्यंत कायम ठेवण्याचाही या इच्छूकांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळेच विद्यमान आमदारांसह इच्छुकांनाही लोकसभेच्या प्रचारात आपली ताकद दाखवावी लागणार आहे. या परीक्षेत कोणते इच्छुक उत्तीर्ण होतात, याचा निकाल लोकसभेच्या निकालावेळीच लागणार आहे.
काँग्रेसकडे सर्वाधिक तीन विधानसभा
१९५१ ते २०१४ या कालावधीत नांदेड लोकसभा मतदारसंघात १५ निवडणुका पार पडल्या. यातील तब्बल १२ निवडणुकांत काँग्रेसने झेंडा फडकावित नांदेडचा बालेकिल्ला राखलेला आहे. केवळ ३ वेळा या मतदारसंघातून मतदारांनी विरोधकांना संधी दिली. १९७७ मध्ये शेकापच्या केशव धोंडगे यांनी विजय मिळविला होता. १९८९ मध्ये जनता दलाच्या तिकीटावर डॉ. व्यंकटेश काब्दे विजयी झाले होते. तर २००४ मध्ये डी. बी. पाटील यांच्या रुपाने या मतदारसंघात भाजपाला एकदाच गुलाल उधळण्याची संधी मिळाली होती. मागील विधानसभा निवडणुकांची आकडेवारी पाहिल्यानंतर याही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पारडे जड दिसते. काँग्रेसच्या ताब्यात तीन मतदारसंघ आहेत. तर भाजपा अवघ्या एका विधानसभेचे प्रतिनिधीत्व करते. मित्र पक्ष शिवसेनेचे दोन आमदार आहेत.
नांदेड शहराचे भाजपासमोर आव्हान
केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या बळावर २०१८ मध्ये झालेल्या नांदेड महापालिका निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न भाजपाने केला खरा.मात्र येथे भाजपा तोंडघशीच पडली. ५३ प्लसचा संकल्प करुन मैदानात उतरलेल्या भाजपाला दोन आकडी संख्याही गाठता आली नाही. काँग्रेसने येथे एकहाती विजय मिळवित ८१ पैकी तब्बल ७३ जागा जिंकल्या. निवडणूक काळात भाजपाने नांदेडच्या मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पडला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सभेनंतरही सेनेला कशीबशी एक जागा जिंकता आली. त्यामुळे नांदेड शहरातील मतदारांना आपल्याकडे खेचण्याचे याहीवेळी भाजपासमोर मोठे आव्हान उभे आहे. यात ते कितपत यशस्वी होतात ते निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. दूसरीकडे वंचित बहुजन आघाडीचाही नांदेड शहरातून अधिकाधिक मते खेचण्याचा प्रयत्न असणार आहे.
नांदेड लोकसभेच्या प्रचार रणधुमाळीने वेग घेतला आहे़ प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात गाठीभेटीसह यंत्रणा कामाला लावण्यामध्ये उमेदवार मग्न होते़ आता त्या उमेदवारांनी बैठका, कॉर्नर सभांवर भर दिला आहे़ पुढच्या टप्प्यात दिग्गज नेत्यांच्या प्रमुख पक्षांकडून सभा होणार आहेत़ त्यानंतरच प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचणार आहे़ या सभांचेही नियोजन सुरू आहे़