इस्लापूर (जि. नांदेड) : सध्या गाजत असलेल्या ईव्हीएम प्रकरणातील आरोपी सचिन राठोड (वय २१, रा.दयाल धानोरा) याने शिवणीच्या बाजारात मासे घेण्याच्या बहाण्याने मच्छीमाराचे सीमकार्ड चोरल्याची कबुली पोलिसांसमोर दिल्याची अधिकृत माहिती आहे.
'१५ लाख रुपये द्या, ईव्हीएममध्ये फेरफार करून देतो', असे सांगून हिमाचल प्रदेशातील अनेकांना निवडणूक आयोगाच्या नावाने एसएमएस पाठवल्याचे उघड झाल्यानंतर नांदेड पोलिसांनी मंगळवारी त्याला बेड्या ठोकल्या़ सीमकार्ड कसे चोरले, ही माहिती घेण्यासाठी पोलिसांनी बुधवारी त्याला इस्लापूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शिवणी येथे नेले़ त्याने दिलेल्या माहितीनुसार १ आॅक्टोबर २०१७ रोजी रविवारी शिवणीच्या बाजारात मासे घेण्याच्या बहाण्याने रामराव झिंगरे (रा.डोंगरगाव) यांना गाठले़ त्यांच्याकडे माशांची मागणी केली़ मासे किती घ्यायचे अशी विचारणा घरी करतो, असे सांगून सचिनने रामराव यांच्याकडील मोबाईल फोन घेतला़ त्यानुसार किती मासे घ्यायचे हे सांगितले़ रामराव हे माशांची काटछाट करताना त्यांची नजर चुकवून त्यांच्या फोनमधील सीमकार्ड चोरले, अशी कबुली दिली आहे.
आरोपी सचिन मुळचा दयाल धानोरा ता. किनवट येथील रहिवासी आहे. तो सध्या सुंदरनगर नांदेड येथे वास्तव्यास होता़ सीमकार्ड चोरी प्रकरणी त्याला इस्लापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़ त्याची सखोल चौकशी सुरू आहे़ यामागे कोणाचा हात आहे? यापूर्वी असे गुन्हे त्याने केले आहेत का? याचा तपास पोलिस घेत आहेत़ इस्लापूरचे सपोनि कायेंदे आरोपीची चौकशी करत आहेत़