नांदेड : अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले याबाबत राजकीय पुढाऱ्यांकडून नेहमी ओरड होत असते़ त्याबाबत पोलिसांना निवेदन देवून कारवाईची मागणीही करण्यात येते़ परंतु तक्रार करणाऱ्या पदाधिकाऱ्यालाच अवैधपणे दारु विक्री करताना पकडले आहे़ ही घटना मुखेड येथे घडली़ त्यामुळे अवैध धंद्यांची तक्रार करणे या पदाधिकाऱ्याच्याच अंगलट आले आहे़
मुखेड शिवसेनेचा उपशहर प्रमुख शंकर चिंतमवाड यांनी तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगत जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ३ सप्टेंबर रोजी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांना निवेदन दिले होते़ पोलिस प्रशासनाच्या आर्शिवादाने हे सर्व अवैध धंदे सुरु असून ते त्वरित बंद करावेत़ स्थानिक पोलिस त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही करण्यात आला होता़ तसेच तालुक्यातील अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली होती़ निवेदन दिल्यानंतर फोटोसेशनही करण्यात आले़
पोलिस अधीक्षक मगर यांनी या प्रकाराची दखल घेत शुक्रवारी कारवाईसाठी मुखेड तालुक्यात पथके पाठविली होती़ त्यांच्यासोबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही होते़ दरम्यान, महामार्गावर ३३ केव्ही जवळ चिंतमवाड यांच्या खानावळीचीही झाडाझडती घेण्यात आली़ या ठिकाणी दारुचा अवैधपणे साठा आढळून आला़ त्यामुळे कारवाईसाठी गेलेले पथकही बुचकाळ्यात पडले़ त्यानंतर चिंतमवाड याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ अवैध धंद्यांची तक्रार करणारेच अवैधपणे दारु विक्री करताना सापडल्याने मुखेड तालुक्यात चर्चेला ऊत आला आहे.