रामेश्वर काकडे
नांदेड : आयुर्वेद महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमासाठी १९८५ साली प्रवेश मिळाल्यानंतर दोन वर्षे शिक्षण घेतले; पण तिसऱ्या वर्षी विद्यापीठ बदलल्याने तृतीय वर्षाला प्रवेश मिळाला नाही. आता तब्बल ३७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर याच विद्यार्थ्याला तृतीय वर्षाच्या प्रवेशाला मान्यता मिळाली आहे. ही कहाणी आहे नांदेडमधील प्रदीप भुजंगराव घाटे यांची.
घाटे हे एससी प्रवर्गातून १९८५ साली नांदेडमधील आयुर्वेद महाविद्यालयात आयुर्वेद पदवी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरले. दोन वर्षे त्यांनी या महाविद्यालयात शिक्षण घेऊन परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु, तिसऱ्या वर्षाला त्यांना प्रवेश मिळाला नव्हता. मध्यंतरीच्या काळात आलेल्या कौटुंबिक अडचणी, विद्यापीठ बदलल्याने निर्माण झालेला पेचप्रसंग यावर मात करत अखेर घाटे यांना ३७ वर्षांनी पुन्हा प्रवेश मिळाला.
शिकण्याची जिद्द कायम nप्रवेश मिळण्यासाठी ३७ वर्षांचा काळ लागला असला तरी जिद्द सोडली नाही.nअर्धवट राहिलेला अभ्यासक्रम आता पूर्ण करण्याचा निश्चय केला आहे.nअधिष्ठाता वाय.आर. पाटील यांच्या सहकार्यामुळे बीएएमएस करण्याची इच्छा पूर्ण होत आहे, असे घाटे म्हणाले.
विद्यापीठ बदलले अन्... बदललेले विद्यापीठ, आयुर्वेद विद्यापीठाकडून येणाऱ्या अडचणी यामुळे त्यांना तृतीय वर्षाला प्रवेश मिळाला नाही. तरीही आयुर्वेदाची पदवी मिळवायचीच, ही जिद्द उराशी बाळगून त्यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला.अखेर आता त्यांना उर्वरित तीन वर्षांसाठी आयुर्वेद पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
अधिष्ठातांनी आदेश केला जारी पारंपरिक विद्यापीठामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचा प्रवेश नियमित करून त्याबाबतची नोंदणी करण्याचा व प्रवेश घेण्याचा आदेश शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता वाय.आर. पाटील यांनी जारी केला. नियमित शुल्क भरण्याच्या सूचना करून प्रवेश पूर्ण करून घेण्याबाबत त्यांनी आदेशित केले आहे.