जमिनीच्या वादातून केली मारहाण
मुक्रमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाळणी येथे जमिनीच्या वादातून मंगलबाई वासरवाड यांना मारहाण करण्यात आली. ही घटना १९ जून रोजी घडली. या प्रकरणात मीना राजेंद्र आटकळे, गोविंद आटकळे यांच्या विराेधात गुन्हा नोंद झाला.
११ हजार रुपयांचा गुटखा पकडला
कंधार शहरातील गांधी चौक भागात पाकीजा पान शॉपवर धाड मारून पोलिसांनी ११ हजार रुपयांचा गुटखा पकडला. आरोपीने विक्रीसाठी वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा ठेवला होता. याप्रकरणात कंधार ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
सारखणी ते माहूर रस्त्यावर दुचाकीवरून जात असताना नियंत्रण सुटल्याने दुचाकीला अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना १८ जून रोजी घडली.
वैभव गणेश ईसाये (रा. पारवेकर नगर माहूर) आणि आकाश खरे हे दोघे जण दुचाकीवरून सारखणी ते माहूर जात होते. यावेळी आकाशने भरधाव वेगाने दुचाकी चालविली. परंतु नियंत्रण सुटल्याने ते दोघेही रस्त्यावर पडले. या अपघातात जखमी वैभवला उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणात आकाश खरे याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला.
धर्माबाद, बिलोली येथे दारू पकडली
धर्माबाद तालुक्यातील मौजे बेल्लूर रस्त्यावर तीन हजारांची तर बिलोली येथे एका रुग्णालयाच्या समोरून साडे पाच हजार रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणात दोन्ही ठाण्यात गुन्हे नोंद झाले.
मजुराने घेतळा गळफास
शहरातील अयोध्यानगर भागात विनायक अशोकराव भडके या मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १९ जून रोजी घडली. भडके यांच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र अद्याप पुढे आले नाही. या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी नोंद केली.