लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : गोकुंदा येथील शिवनगरी येथील सेवा सदनमध्ये राहणाऱ्या व शांतिनिकेतन इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापिका सुरेखा विजय राठोड (३८) यांचा त्यांचे राहत्या घरातच तीक्ष्ण हत्याराने निर्घृणपणे खून केल्याची घटना २३ आॅगस्ट रोजी दुपारी १२.२० च्या दरम्यान घडली़ रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सेविकेला दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली़भोकर रस्त्यावर गोकुंदा येथे आयटीआयच्या बाजूला शिवनगरी वस्ती असून या वस्तीत बहुतांश मध्यमवर्गीय वास्तव्यास आहेत़ गुरुवार वनोळा येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्रा़ विजय राठोड सकाळी नऊ ते सव्वानऊचे दरम्यान वनोळासाठी निघाले होते़ तर शांतिनिकेतन इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापिका असलेल्या सुरेखा राठोड या शाळेत न जाता घरीच होत्या़ सहाव्या वर्गात शिकणारी ऐश्वर्या ही राठोड यांची मुलगी शाळेत गेली होती़ मॅडम आल्या नाही म्हणून शाळेच्या शिक्षकांनी सकाळी दहा वाजेपर्यंत भ्रमणध्वनीवरून सुरेखा यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला़ दरम्यान मॅडम आल्या नाहीत म्हणून व ऐश्वर्याचा डबा घेण्यासाठी म्हणून शाळेच्या सेविका शकुंतला वाळे या सेवासदन या निवासस्थानी गेल्या असता तेथे सुरेखा राठोड या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या़ हा प्रकार पाहिल्यानंतर सेविका वाळे यांनी एकच आरडाओरड केली़ त्यानंतर शेजारच्यांनी घटनास्थळी धाव घेतली़ खून करण्यामागे हेतू काय असावा? याचे गूढ अद्यापही उकल झाले नसले तरी सुपारी देऊन खून झाला तर नाही ना? की चोरट्यांनी ठार मारले? असा कयास लावला जात आहे़ दरम्यान, दोन दिवसांपूर्वी विजय राठोड व पत्नी मयत सुरेखा यांनी सहा तोळे सोने खरेदी केले होते अशी चर्चा घटनास्थळ परिसरात ऐकावयास मिळत होती़ एकट्यानेच हे कृत्य केले असल्याची शंका पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी व्यक्त केली़पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हामयत सुरेखा राठोड यांचा भाऊ विलास जाधव यांनी गुरुवारी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीत माझ्या बहिणीला वारंवार त्रास होता, अनैतिक संबंधात ती अडसर होती, यामुळे आरोपी पती विजय राठोड, त्याची मैत्रीण वैशाली माने, अशोक टोपा राठोड (रा. चव्हाणवाडी, हणेगाव ता. देगलूर), अनुसया टोपा राठोड (सासू) व प्रमोद उर्फ अजय थोरात (शिक्षक मित्र) यांनी कट रचून तिला जीवे मारले, असे नमूद केले. किनवट पोलिसांनी वरील ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास पाटील तपास करीत आहेत.पोलिस पोहोचले घटनास्थळीघटनेची माहिती पोलिसांना मिळताच दुपारी एकच्या सुमारास पोलिस निरीक्षक विकास पाटील सहकाºयांसह घटनास्थळी दाखल झाले़ तब्बल पाच तास पंचनामा सुरू होता़ पोलिसांनी श्वान पथक व फिंगरप्रिंट स्कॉडलाही पाचारण केले़ सायंकाळी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोकुंदा येथील रुग्णालयात पाठविण्यात आला़
किनवटमध्ये मुख्याध्यापिकेचा भरदिवसा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 1:05 AM