शहराच्या देगलुर नाका, हैदरबाग येथील मनपाच्या रुग्णालयातील रुग्णवाहिका, एक्स-रे व सोनोग्राफी मशीन आदी वैद्यकीय सुविधांचे लोकार्पण ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. मंचावर माजी मंत्री डी.पी. सावंत, काँग्रेसचे विधान परिषदेतील प्रतोद आ. अमरनाथ राजुरकर, आ. मोहनराव हंबर्डे, महापौर मोहिनी येवनकर, उपमहापौर मसुद खान, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्रसिंघ गाडीवाले, माजी महापौर अब्दुल सत्तार, नगरसेवक शेरअली खाँन, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने आदींची उपस्थिती होती.
या वेळी पालकमंत्री चव्हाण म्हणाले, या भागातील नागरिकांना शासकीय रुग्णालयात जाण्यापेक्षा त्यांना सुविधा हैदरबाग येथील मनपाच्या रुग्णालयात उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. रुग्णवाहिका, एक्स-रे व सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यानंतरही आवश्यकतेनुसार आणखी अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. यामुळे अन्य रुग्णालयातं जाण्याची गरज येथील रुग्णांना भासणार नाही.
आरोग्य, शिक्षण व मूलभूत सोयी-सुविधा नांदेडकरांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी विमानसेवा असावी यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचे सांगत नांदेडच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. आगामी काळात प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. नांदेडकरांनी विकासासाठी आपल्यावर टाकलेला विश्वास असाच कायम ठेवावा, विकासाची जबाबदारी आपली असल्याची ग्वाही चव्हाण यांनी या वेळी दिली.
या वेळी आ. बालाजी कल्याणकर, नगरसेवक शेरअली खान आदींनी विचार मांडले. तर प्रास्ताविक आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी केले. या कार्यक्रमास देगलूर नाका व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.