नांदेड : एक महिन्यापासून बेमुदत संपावर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी २८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
शासकीय सेवेमध्ये कायमस्वरूपी समायोजन करावे, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीच्या माध्यमातून२५ ऑक्टोंबरपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. काही कर्मचाऱ्यांनी याच मागणीसाठी उपोषणही सुरू केले आहे. सध्या उपलब्ध रिक्त पदावर ३० टक्के आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी आणि ७० टक्के नवीन कर्मचारी याप्रमाणे पद भरती करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते; परंतु कंत्राटी कर्मचारी समायोजनाबाबत कार्यक्रमाची रूपरेषा अद्यापही निश्चित झाली नाही.
त्यामुळे धोरणात्मक निर्णय जाहीर करावा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यासाठी काही वर्षांचा काळ लागू शकतो, त्यादरम्यान सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन द्यावे, शासकीय सेवेतील नियमित कर्मचाऱ्यांना मिळणारे सर्व लाभ उपलब्ध करून द्यावेत, कंत्राटी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्या करण्यात आल्या.
मंगळवारी सकाळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.