श्रीक्षेत्र माहूर : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत माहूर तालुक्यात अंगणवाडी आणि शाळा तपासणी पथकाला हृदय विकारच्या ६ संशयित रुग्ण आढळले. त्यांना शस्त्रक्रीया व अधिक उपचारासाठी एस़एल़रहेजा रुग्णालय मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. ९ रोजी गटविकास अधिकारी व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये रुग्णवाहिकेतून नांदेड व तेथून रेल्वेने मुंबईला रवाना करण्यात आले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत २०१८-१९ मध्ये ० ते १८ वयोगटातील बालकांची अंगणवाडी व शाळा तपासणीच्या वेळी आढळलेल्या संशयित हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची हृदय शस्त्रक्रिया पूर्वतपासणी या पूर्वी करण्यात आली होती. यात मोहिनी विजय राठोड (१३), रुद्र मधुकर इंगोले (१०), अश्विनी संतोष हिंगळे (१०), चेतन दिलीप राठोड (२), नंदनी दिलीप इंगोले (९), सारिका तुकाराम बोरकर (४) हे सहा विद्यार्थी पात्र आढळले. या ६ विद्यार्थ्यांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून एस.एल.रहेजा हॉस्पिटल माहीम मुंबई येथे विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांचा पालकांना गटविकास अधिकारी विशालसिंह चौहाण, वैद्यकीय अधीक्षक भोसले, वैद्यकीय अधिकारी ए.डी.आंबेकर, एस.ओ.मुंगीलवार, एन.बी.ढोणे यांच्या उपस्थित रवाना करण्यात आले आहे.
माहूर तालुक्यातील सहा विद्यार्थ्यांवर मुंबईत हृदय शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:28 AM