नांदेड: पोटाची खळगी भरण्याकरिता प्लॅस्टिक कचरा वेचण्यास गेलेल्या एका मातेवर ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रस्त्याच्या कडेला झोपवलेल्या चार महिन्याच्या बाळाला ट्रॅक्टरने चिरडले असल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजेदरम्यान, जुना कौठा परिसरात घडली.
या दुर्घटनेची माहिती अशी की, मुदखेड ( जि. नांदेड ) येथील रहिवासी असलेल्या मनिषा राहूल वाघमारे ( २२ ) कचरा वेचून आपला उदरनिर्वाह करतात. आज सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या चार महिन्यांच्या चिमुकल्यास सोबत घेवून मनीषा कचऱ्यातील प्लॅस्टिक-बॉटल्या जमा करण्यास जुना कौठा परिसरात गेल्या. काम लवकर आवरण्याच्या उद्देशाने मनीषा यांनी चिमुकल्यास साईबाबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारी झोपवले. दरम्यान, तेथे कचरा टाकण्याकरिता एक ट्रॅक्टर आले. चालकाने ट्रॅक्टर मागे घेताना त्याखाली रस्त्याच्या कडेला झोपवलेला चिमुकला चिरडला गेला.
काहीवेळाने तिथे आलेल्या मनीषाने समोरचे दृश्यपाहून हंबरडा फोडला. चिमुकला मरण पावल्याचे लक्षात येताच चालक तेथून ट्रॅक्टर घेवून पसार झाल्याची माहिती पोलीस ठाणे अंमलदार तथा सहाय्यक पोउपनि. ज्ञानोबा गिते व मदतनीस महिला पो. कॉ. ज्योती आंबटवार यांनी दिली. याप्रकरणी मनिषा राहूल वाघमारे (रा. मुदखेड जि. नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीच्याआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी ट्रॅक्टर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. आनंद बिचेवार व हेडकॉन्स्टेबल बालाजी लाडेकर हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, नांदेडच्या कौठा परिसरात हृदय पिळवटून टाकणाऱ्या या दुर्घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.