नांदेड - जिल्ह्यात बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत सरासरी 18.01 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक पाऊस मुखेड तालुक्यात 59.06 मिमी इतका झाला आहे. मुखेड तालुक्यातील चांडोळा महसूल मंडळात सलग दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात 4 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.
जिल्ह्यात सोमवारी रात्री अनेक भागात मुसळधार पाऊस झाला होता. जिल्ह्यातील बिलोली, मुखेड, देगलूर आणि नायगाव तालुक्यात 8 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली होती. मंगळवारी बिलोली, मुखेड, किनवट तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला होता. त्यानंतर काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. परंतु बिलोली आणि मुखेड तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. बिलोली तालुक्यात कुंडलवाड़ी महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. येथे 79.50 मिमी पावसाची नोंद झाली. त्याचवेळी मुखेड तालुक्यातील चांडोळा मंडळात मंगळवारी 97.95 मिमी पाऊस झाल्यानंतर बुधवारीही या मंडळात अतिवृष्टीची झाली. तब्बल 98.50 मिमी पाऊस येथे नोंदवला आहे. कंधार मध्येही 85 मिमी आणि धर्माबाद तालुक्यातील करखेली महसूल मंडळात 76.50 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात या चार महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.
बुधवारी सकाळी जिल्ह्यात 18.01 मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. मुखेड तालुक्यात 59.06 मिमी, बिलोली 29, कंधार 26.06, लोहा 14, भोकर 23.07, देगलूर 18.06, हिमायतनगर 14.07, उमरी 10.08 मिमी आणि नायगाव तालुक्यात 25.08 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यातही हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे.