अर्धापूर तालुक्यातील दाभड, बामणी, येळेगाव, मालेगाव, लहान, खैरगाव, शेलगाव, देळूब, शेनी आदी परिसरात शुक्रवारी ७ मे रोजी दुपारी वादळी वारा, गारांसह पाऊस पडला. यामुळे काढणीस आलेली केळी, शेवगा, ज्वारी आदींचे नुकसान झाले. आंब्याची फळे गळाली व झेंडू, गलांडा, शेवंती आदी फुलांच्या बागांचे व केळीच्या बागांचे नुकसान झाले. काढणी सुरू असलेला भुईमूग व हळद शिजवणे सुरू असल्याने अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अर्धापूर तालुक्यात दुपारी दीड वाजल्यापासून वादळी वारे, गारपीट व पाऊस सुरू झाला. वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ सुरू झाली. शुक्रवारी आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. गारपीट व अवकाळी पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. केळीच्या बागांचे मोठे नुकसान शुक्रवारी पुन्हा वादळी वाऱ्यामुळे झाले. सर्वच भागातील केळीची पाने फाटली. दाभड, मालेगाव, बामणी आदी परिसरात केळीच्या बागांचे नुकसान झाले.
.
▪▪प्रतिक्रिया ▪▪
देशभरात केळीसाठी प्रसिद्ध असलेला अर्धापूरचा शेतकरी मागच्या वर्षीपासून केळी पिकावर होत असलेल्या अवकृपेमुळे पार कोलमडून पडला आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी.
- श्याम कदम, बामणी, शेतकरी