यंदा मृग नक्षत्र सुरू होताच पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. परंतु, आर्द्रा कोरडेच गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली होती. परंतु, चार दिवसांपूर्वीच झालेल्या हलक्या पावसाने पीकांना संजीवनी मिळाली होती. परंतु शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत होते. पावसाने ओढ दिल्याने तापमानाचा पाराही ३८अंशांवर पोहोचला होता. त्यामुळे नांदेडकर घामाघूम होत हाेते. शनिवारी रात्री नांदेड शहरासह जिल्ह्याच्या काही भागात रिमझिम पाऊस झाला. रविवारी दुपारीही काही मिनिटे पावसाने बॅटिंग केली. परंतु, सायंकाळी पाच वाजल्यानंतर मात्र विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला होता. काही वेळातच शहरातील रस्त्यावर पाणी साचले होते, तर सखल भागातही गुडघाभर पाणी जमा झाले होते. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला.
नांदेड शहरात मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:12 AM