उमरी : तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले असून महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करून तत्काळ शासनातर्फे भरीव मदत जाहीर करावी, अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचे उमरी तालुकाध्यक्ष सुधाकरराव देशमुख धानोरकर यांनी दिला. यासंदर्भात भाजपा कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या वतीने उमरीचे तहसीलदार माधव बोथीकर व गटविकास अधिकारी पी.के. नारवाटकर यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील ग्रामीण भागात पावसामुळे बरीच घरे पडून नुकसान झाले. अनेकांच्या घरांत पाणी शिरल्याने अन्नधान्य कपडेलत्ते भिजून खराब झाले. गेल्या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीचा सामना करतांना गोरगरिबांच्या नाकी नऊ येत आहेत. तालुक्यात ज्यांना निवाऱ्यासाठी साधे घर नाही. अशा कुटुंबांना तत्काळ घरकुल देण्यात यावे व सद्यस्थितीत त्यांचे कुटुंब उपाशी राहु नये . म्हणून आर्थिक मदत जाहीर करावी .अशीही मागणी देशमुख यांनी केली आहे येत्या पंधरा दिवसांत पंचनामे पूर्ण करून मदत मिळाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे .