नांदेडमध्ये काँग्रेसच्या मुलाखतीला इच्छुकांची तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 05:33 PM2019-08-03T17:33:03+5:302019-08-03T17:35:23+5:30
अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश
नांदेड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाने जय्यत तयारी सुरू केली असून जिल्ह्यातील नऊही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या शुक्रवारपासून मुलाखती सुरु करण्यात आल्या आहेत़ ३ आॅगस्ट रोजीही मुलाखती सुरु राहणार आहेत़ पहिल्या दिवशी झालेल्या मुलाखतींना इच्छुक उमेदवारांसह समर्थकांनी तोबा गर्दी केली होती.
येथील प्रगती महिला मंडळाच्या सभागृहात काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीस सकाळी १० वाजता प्रारंभ झाला. विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांचे मनोगत जाणून घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे मुलाखतस्थळी उपस्थित होते. पक्षनिरीक्षक म्हणून औरंगाबादचे माजी आ़ सुभाष झांबड, लियाकत अली अन्सारी यांची उपस्थिती होती.
एकेका मतदारसंघाच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्या मतदार संघातील इच्छुकांना पाचारण करण्यात येत होते़ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी जिल्हा निवड समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी माजी पालकमंत्री आ.डी.पी.सावंत, आ.वसंतराव चव्हाण, महापौर दीक्षा धबाले, जि.प.अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, माजी खा. सुभाष वानखेडे, माजी आ. ईश्वरराव भोसीकर, रोहिदास चव्हाण, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माधवराव जवळगावकर, बी.आर.कदम, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर आदींची यावेळी उपस्थिती होती.
सकाळच्या सत्रामध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी आपआपल्या समर्थकांसह हजेरी लावली. या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले़ आपण पक्षासाठी आतापर्यंत काय केले? याचा लेखाजोखा सर्व इच्छुक उमेदवारांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व पक्षनिरीक्षकांपुढे मांडला. तसेच पक्ष जो कोणता उमेदवार देईल, त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे राहून काम करू, अशी ग्वाहीही इच्छुक उमेदवारांनी दिली. या मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्तीची असल्यामुळे या मुलाखती खूप वेळ चालल्या. त्यातही अनेकवेळेला नगरसेवकासह महापालिकेत इतर अनेक पदे भूषविलेल्या मंडळींनी आपणच दक्षिणमधून योग्य दावेदार असल्याचे समितीला पटवून देण्याचा प्रयत्न केला़ यावेळी त्यांच्या समर्थकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता़
नांदेड दक्षिणनंतर मुखेड, देगलूर व हदगाव या विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ३ आॅगस्ट रोजी नांदेड उत्तर, भोकर, किनवट, नायगाव व लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत.
इच्छुकांच्या समर्थकांची संख्या लक्षात घेऊन प्रगती महिला मंडळाच्या सभागृहात मुलाखत आसन व्यवस्था केली होती. इच्छुक आणि समर्थकांच्या गर्दीमुळे प्रगती महिला मंडळास आजच्या मुलाखतीमुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
पक्ष जो उमेदवार देईल त्यासोबत राहा-चव्हाण
काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा व धर्मनिरपेक्ष विचारांवर विश्वास ठेवणारा पक्ष असून या पक्षात इच्छुकांची संख्या जरी मोठी असली तरी,पक्ष जो उमेदवार देईल, त्यांच्यासोबत सर्व इच्छुकांनी राहावे, असे आवाहन यावेळी अशोकराव चव्हाण यांनी उपस्थितांना केले. तसेच उमेदवारी मागणाऱ्या तरुणांचेही चव्हाण यांनी कौतुक केले़