नांदेड : दोन दिवसांपासून रेल्वे गाड्या फुल्ल होऊन धावत असल्याने आणखी दोन विशेष एकेरी रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. मात्र पुणे मुंबई या मार्गावर या दोन्ही विशेष रेल्वे धावणार नसल्याने प्रवाशांना कितपत फायदा होणार हा प्रश्नच आहे.
दिवाळीचा सण आटोपला असून मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमधून चाकरमाने परतीच्या प्रवासाला लागले आहेत.विशेषता सोमवारपासून नोकरीच्या ठिकाणी रुजू होण्याचे नियोजन असल्याने रेल्वे गाड्यांना शनिवार आणि रविवार अशा दोन्ही दिवशी मोठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले होते. रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने आणखी दोन विशेष रेल्वे गाड्या एकेरी मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबाद- भगत की कोठी आणि गुंटूर -जयपूर या दोन रेल्वे गाड्यांची प्रत्येकी एक फेरी केली जाणार आहे. हैदराबाद- भगत की कोठी (०७०२१ ) ही रेल्वे २२ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ पाच वाजता हैदराबाद येथून सुटणार आहे. सिकंदराबाद, मेदचल, वाडियाराम, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव मार्गे ही रेल्वे धावणार आहे. त्याचप्रमाणे गुंटूर -जयपूर (०७०२२) ही रेल्वे देखील २२ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता सुटणार असून, विजयवाडा, खम्मम, वारंगल, नागपूर, इटारसी, भोपाळ, सुजलापूर या मार्गाने धावणार आहे. रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन या दोन्ही रेल्वे गाड्यांच्या विशेष फेऱ्या चालविल्या जात आहेत.
प्रत्यक्षात नांदेडसह मराठवाड्यातील इतर रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता पुणे आणि मुंबईकडे धावणाऱ्या रेल्वे गाड्यांनाच प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे या दोन मार्गावर विशेष रेल्वे सोडण्याची किंवा रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्याची आवश्यकता आहे. रेल्वे प्रशासनाने रविवारी विशेष फेऱ्या वाढविल्या असल्या तरी त्यात पुणे आणि मुंबईकडे धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचा समावेश नाही. त्यामुळे या भागातील प्रवाशांना या विशेष रेल्वे फेऱ्यांचा कितपत फायदा होतो हा प्रश्नच आहे.