पदोन्नती आरक्षण लागू करा
नांदेड : राज्य सरकारने मागासवर्गीय पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले आहे. ते त्वरित लागू करावे, अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे करण्यात आली. या वेळी काँग्रेस कमिटीच्या मागासवर्ग सेलचे जिल्हाध्यक्ष गंगाधर सोंडारे, प्रदेश सरचिटणीस शिल्पा नरवाडे, उपाध्यक्ष शिवराज कांबळे, अजय एडके, सचिव रवींद्र दिपके आदींची उपस्थिती होती.
ठाकूर यांचा सत्कार
नांदेड : कोरोनाकाळात रुग्णांसह त्यांचे नातेवाईक, बेरोजगार गरजू यांना आजपर्यंत २८ हजार जेवणाचे डबे वितरित करणाऱ्या ॲड. दिलीप ठाकूर यांचा खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांची प्रमुख उपस्थिती होती. डबे वितरणासाठी अरुणकुमार काबरा, सुरेश शर्मा, संतोष ओझा, धीरज स्वामी, प्रशांत पळसकर, अमोल कुलथिया, कामाजी सरोदे, राजेशसिंह ठाकूर आदींनी सहकार्य केले.
रुग्णालय परिसरात अन्नदान
नांदेड : कै. जम्मूसिंह ठाकूर यांच्या द्वित्तीय स्मृतिदिनानिमित्त जम्मूसिंह मित्रमंडळाच्या वतीने सर्व शासकीय रुग्णालयात अन्नदान करण्यात आले. या वेळी राहुलसिंह ठाकूर, बालाजीसिंह बैस, दीपकसिंह बैस, कन्हैयासिंह बैस, गिरधरसिंह बैस, नारायणसिंह बैस आदींची उपस्थिती होती.
सबस्टेशन उभारण्याची मागणी
नांदेड : नांदेड शहरातील देगलूर नाका आणि चौफाळा परिसरातील ट्रान्सफाॅर्मर बदलून मोठ्या शक्तीचे बसवावे, अशी मागणी उपमहापौर मसूद अहेमद खान व नगरसेवकांनी कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे. या भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्राहकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळविण्यासाठी नवीन सबस्टेशन उभारावे, असेही निवेदनात म्हटले आहे.
कॅल्शियम कार्बाईडचा वापर थांबवा
नांदेड : बाजारात सध्या विक्री होत असलेल्या केळी व आंबे पिकविण्यासाठी राजरोसपणे कॅल्शियम कार्बाईडचा वापर होत आहे. हा प्रकार कर्करोगास निमंत्रण देणारा आहे. परंतु, तरीही वापर वाढल्याने ग्राहकांच्या जीवितास धोका उद्भवू शकतो. त्यामुळे या प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासनाने लक्ष घालून कॅल्शियम कार्बाईडचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.