भारत दाढेल।नांदेड : नृसिंह क्षेत्राशिवाय शैव आणि महानुभवांचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहेर ता़ नायगाव बाजार येथील १३ व्या शतकातील हेमाडपंती मंदिर व राहेरच्या अलौकिक बाबी जपण्यासाठी विकासाची पावले उचलण्याची गरज आहे़ मात्र पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे या मंदिराचे वैभव हरवले आहे़नायगाव तालुक्यातील राहेर येथील १३ व्या शतकातील यादवकालीन दगडी शिल्पकला असलेले हेमाडपंती नृसिंह मंदिर गोदावरी नदीकाठापासून ४ कि़ मी़ अंतरावर आहे़ गावाच्या पुनर्वसनामुळे हे मंदिर एकाकी पडले आहे़राहेरचे हेमाडपंती मंदिर पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित असल्याने ते स्वत: या मंदिराचे काम करीत नाहीत व दुसऱ्यांनाही करू देत नाहीत़ मंदिराच्या परिसरात सुरू असलेल्या वीटभट्ट््यामुळे मंदिराचे अस्तित्व धोक्यात आले आहे़यादवकालीन हेमाडपंती मंदिराचे वैभव टिकून राहण्यासाठी मंदिर समितीचे विश्वस्त धनंजय जोशी व ग्रामस्थांनी अनेकवेळा पत्रव्यवहार केला़ त्यामुळे पर्यटन विभागाकडून ७७ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला़ या निधीतून मंदिर परिसरात बागबगीचा, मुख्य रस्त्याला कमान व अंतर्गत रस्त्याची कामे सुरू आहेत़ परंतु या रस्त्यावरून जड वाहनांची रहदारी सुरू असल्याने रस्त्याची चाळणी होत आहे़ या मार्गावरून जड वाहने थांबविणे गरजेचे आहे़संतांनी आणली राहेरला ईश्वराची पालखी
- राहेरच्या गोदाकाठी संत बाळगीर महाराज, मायानदेव प्रभू, चक्रधर स्वामी, दासगणू महाराज आदींचे वास्तव्य होवून गेले़ तीर्थक्षेत्र राहेरचे मंदिर १३ व्या शतकातील हेमाडपंती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे़
- ध्यानधारणेसाठी ही जागा पवित्र व रमणीय आहे़ या ठिकाणी संतांनी व महात्म्यांनी इशप्राप्तीसाठी प्रयत्न केले़ ही जागा पावित्र्य जपल्याने वंदनीय झाली़ नदीकाठच्या तीर्थक्षेत्राच्या बाबतीत गोदाकाठी नाशिक, पैठण, गंगाखेड, नांदेड, राहेर, संगम, कंदकुर्ती, बासर या ठिकाणी संत-महात्म्यांनी संस्कृती संवर्धनासाठी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे़
- तीर्थक्षेत्र राहेर सर्व देवांचे माहेरघर म्हणून परिचित आहे़ राहेरला तीर्थक्षेत्र घडविण्यासाठी संत महात्म्यांनी ईश्वराची पालखी आणली असे म्हटले जाते़ महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामींचे दीर्घकाळ वास्तव्य व त्यांच्या कार्यकाळातील योगदान महत्त्वाचे मानले जाते़